द्रोणनिधन
द्रुपदाने सभेत अपमान केल्यामुळे द्रोणांनी तरुण शिष्यांच्या साह्याने त्याचा पुन्हा पराभव केला होता. द्रुपदानेही त्यांच्या वधार्थ इश्वरी कृपेने यज्ञकुंडातून ’धृष्टद्युम्न’ हा पुत्र मिळविला होता. भारतीय युद्धात हाच पांडवांचा मुख्य सेनापती झाला. द्रोणांनी पांडव सैन्याला जर्जर केले. द्रोणांना कसे आवरावे ह्या प्रश्नाने पांडव चिंतित होते. अनिष्ट घटना कानावर आल्यास आपण शस्त्रत्याग करु असे द्रोणांनी पांडवांना विदित केले होते. कृष्णाने डावपेच रचला. द्रोण सेनापती झाल्यानंतर युद्धाच्या चवथ्या दिवशी जयद्रथाचा वध अर्जुनाने केला होता. पाचव्या दिवशी चांगलीच रणधुमाळी माजली. ठरविल्याप्रमाणे भीमाने’अश्वत्थामा’ नावाच्या हत्तीला मारले व अश्वत्थामा मेला अशी कंडी उठविली. द्रोणांचे मन त्यामुळे द्विधा झाले. आपला अश्वत्थामा खरोखर मेला की काय हे सत्य जाणण्यासाठी त्यांनी युधिष्ठिराला विचारले; कारण तो सत्यवादी होता. युधिष्ठिराने अश्वत्थामा मेला असे खोटे सांगितले. द्रोणाचार्य खचले. त्यांचा रथ परत फिरल्यावर ’गज’ असे तो हळूच पुटपुटला. द्रोणांनी शोकामुळे शस्त्र टाकले व ते रथात स्वस्थ बसले. तेवढयात धृष्टद्युम्न वेगाने आला व त्याने रथावर चढून त्यांचा वध केला. युधिष्ठिराचा रथ या असत्य बोलण्यामुळे भूमीपासून चार अंगुळे वर चालत होता---तो जमिनीवर चालू लागला.
द्रोणनिधन
सेनानीने प्राण अर्पुनी रणात ऋण फेडिले ॥धृ॥
द्रोण प्रतापी रणी गाजले
कर्दनकाळासम वावरले
रिपुसेनेचे धैर्य गळाले
धनुष्य द्रोणांच्या हातातिल विजयध्वज भासले ॥१॥
अभ्रा पळवी वादळवारा
तसे पळविले अगणित वीरा
रक्ताचा जणु पूर वाहिला
शौर्य अलौकिक पाहुन पांडव धैर्यहीन झाले ॥२॥
कृष्णाने रचली रणनीती
धर्माने त्या दिली संमती
केली मसलत द्रोणांसाठी
गुप्त योजना आखुनी रात्री कृष्णार्जुन परतले ॥३॥
’अश्वत्थाम्या’ गजा मारुनी
’अश्वत्थामा मेला’ म्हणुनी
वृत्त दिले सैन्यात झोकुनी
रणांगणावर वृत्त पसरता द्रोण खिन्न झाले ॥४॥
सत्यप्रिय धर्मास भेटुनी
विचारले त्या श्वास रोखुनी
’रणांगणी गेला का द्रौणी ?’
’गेला अश्वत्थामा’ ऐसे धर्मे सांगितले ॥५॥
शोकमग्न जाहले तत्क्षणी
द्रुपदपुत्र परि आला धावुनी
वृष्टि शरांची करि सेनानी
विद्ध जाहले महारथी ते दारुण रण माजले ॥६॥
निकट येउनी म्हणे वृकोदर
’सत्य बोलला असे युधिष्ठिर’
ऐकताच त्या दुःख अनावर
अश्रू ढाळुन पुत्रासाठी शस्त्र रथी टाकिले ॥७॥
कथिले दुर्योधना ओरडुन
’शस्त्र टाकिले, सांभाळा रण"
रथी बैसले चापशराविण
व्योम शिरी कोसळले मानुन, ध्यानमग्न झाले ॥८॥
पांडव सेनापती त्याक्षणी
वायुगतीने येई धावुनी
तीव्र खड्ग हातात घेउनी
चढे रथावर, क्रोधे त्यांचे शिर त्याने छेदिले ॥९॥
असे गुरुंना कसे मारले ?
सन्मार्गे ते सदा चालले
रणांगणी योद्धे हळहळले
उपकाराच्या फेडीसाठी प्राणही त्यांनी दिले ॥१०॥
सैन्य कुरुंचे धावत सुटले
दुर्योधनमुख मलीन झाले
शौर्य आज जणू लोप पावले
प्राण गुरुंचे विलीन सत्वर अनंतात झाले ! ॥११॥