द्रौपदीचा विलाप
अमानुष नरसंहार करुन ते अश्वत्थामादी तीन रथी परत दुर्योधनापाशी आले. त्यांनी त्याला रात्री केलेल्या भयंकर कत्तलीची व जाळपोळीची कल्पना दिली. राजा आनंदाने म्हणाला ----"भीष्म, कर्ण या कोणाच्याही हातून जे घडले नाही ते अश्वत्थाम्या तू केलेस ! तुमचे तिघांचे कल्याण होवो !’ एवढे बोलून दुर्योधनाने प्राण सोडले. धृष्टद्युम्नाच्या सारथ्याने पांडवांना हा घोर संहार झाल्याचे सांगितले. सर्व पांडवांना फार दुःख झाले. द्रौपदीला हा आघात कसा सहन होईल याची धर्माला चिंता होती. नकुल द्रौपदीला घेऊन आला. तिला हे पुत्रांचे दुःखद वृत्त कळताच ती दुःखावेगाने मूर्च्छित पडली. भीमाने तिला सावरले. युद्धातून शौर्याने जिवंत राहिलेले पुत्र असे झोपेत असताना मारले गेले. तिच्या जीवनात सर्वच शून्यवत झाले. पाच पुत्र, सौभद्र व आपल्या भावांच्या निधनामुळे तिचे अश्रू थांबेनात. तिने सांगितले-----"प्राणनाथ, मला हा शोक अक्षरशः जाळीत आहे. त्या नराधम अश्वत्थाम्याचा तुम्ही वध न कराल तर मी इथेच बसून राहून प्राण सोडीन. त्याला शोधून काढा व त्याला ठार मारुन त्याच्या मस्तकाला मणी घेऊन या.’ अश्वत्थाम्याच्या वधासाठी भीमसेन निर्धाराने निघाला.
अता मी काय करु जगुनी
कधी ना सरेल ही रजनी ॥धृ॥
आर्त ध्वनी शिबिरात निघाले
अंधारातच प्रहार झाले
निजलेले सुत पाचही गेले
घात हा केला दुष्टांनी ॥१॥
कष्ट सोसले अरण्यातले
तुम्हासवे नित वणवण फिरले
दुःख परी हे मनि न कल्पिले
वाटते गेले नभ फाटुनी ॥२॥
विजय नगारे मीहि ऐकले
परि या दुःखे कान बधिरले
एका रात्रित आप्तही गेले
विरे ना आक्रोशाचा ध्वनी ॥३॥
दुःख नको मातेला असले
पिता बंधु मज कुणी न उरले
नभातले तारे जणु पुसले
रक्षिण्या नव्हते तेथे कुणी ॥४॥
पुत्राविण मज व्यर्थ सर्वही
पाच पती परि अनाथ मीही
खरा पराजय आज मि पाही
अंधार दिसे मज दिशांतुनी ॥५॥
राज्य जिंकले रणात लढुनी
विजय मिळे हा मोल देऊनी
हर्ष होऊ द्या आपुल्या मनी
स्मरा तरि सौभद्रा या क्षणी ॥६॥
पुत्र पाचही कुलदीपक ते
आठवण त्यांची उरी दाटते
काळिज माझे तिळतिळ तुटते
राहतिल अश्रु सदा नयनी ॥७॥
निर्दयतेचा कळस गाठला
शत्रुंनी जय व्यर्थ ठरवला
शोधा झणि त्या नराधमाला
अर्जुना मारा तो द्रौणी ॥८॥
दुःख असे हे मज सहवेना
ज्वाळा माझ्या जाळती मना
पुन्हा न दिसतिल सुत डोळ्यांना
प्राण हे का न जात निघुनी ? ॥९॥
नीचकृत्य हे असे खरोखर
ठार करा त्या क्रूरा सत्वर
मिळते ना त्या शासन जोवर
तोवरी राहि इथे बसुनी ॥१०॥
निक्षुन मी सांगते नृपाळा
रणात मारा त्या दैत्याला
घेउन या मणि मस्तकातला
शांत मन होइल तो बघुनी ॥११॥