कुंतीचे मनोगत
कृष्णशिष्टाई सफल झाली नाही हे कृष्णाकडूनच कुंतीला कळले. तिने कृष्णाला पांडवांसाठी निरोप सांगितला की पांडवांनी प्रयत्नांची शर्थ अक्रुन व आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपले राज्य परत मिळवावे. दुष्ट शत्रूची मुळीच गय करु नये. विदुराने कुंतीची भेट घेऊन सांगितले की युद्ध टाळण्यासाठी तो दुर्योधनाच्या कानीकपाळी ओरडत आहे पण तो मुळीच ऐकत नाही. संधी न होताच श्रीकृष्ण परत गेल्यामुळे पांडव हातात शस्त्र घेतल्याशिवाय राहाणार नाहीत आणि युद्ध पेटलेच तर त्यात कौरवांचाच नायनाट होईल. ज्ञातीच्या कल्याणार्थ कुंतीही चिंताग्रस्त होऊन म्हणाली की युद्ध उभे राहिल्यास कुलक्षय व आप्तस्वकीयांचा नाश ओढावल्याशिवाय राहणार नाही. हा अनर्थ होणे हे किती दुःखदायक आहे ! युद्ध न करावे म्हटले तर पांडवांना कायम राज्यापासून वंचित राहावे लागणार. भविष्याचा विचार करता तिच्या मनात कोलाहल माजतो व उरात धस्स होते. एक उपाय मनात येतो की कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगावे व त्याचे मन पांडवांकडे वळवावे. यासाठी ती लगेचच त्याची भेट घेते व त्याला सत्य सांगते.
कुंतीचे मनोगत
कृष्णाचे कर हे रिक्त कसे ?
मनि माझ्या काहुर दाटतसे ॥धृ॥
वनवासाची दुःखे दारुण
अज्ञातातिल दबले जीवन
स्थानी स्थानी फिरले वणवण
क्लेशांना सीमा मुळी नसे ॥१॥
कपटाचा तो खेळ मांडुनी
जिंकत गेला वंचक शकुनी
सर्वस्वाची झाली हानी
पडलेच जणू नभ शिरी जसे ॥२॥
कृष्ण अपयशी सभेत झाला
युद्धाचा ज्वर सुयोधनाला
राज्यहीन ठेवू धर्माला
दुष्टांच्या मनि हे घाटतसे ॥३॥
करु नका असला समजोता
नको करारही तो वांझोटा
राज्याविण रे कसे राहता ?
भित्र्यांचे होते जगी हसे ॥४॥
स्मरा आपुली घोर वंचना
पांचालीच्या त्या अवमाना
रणी धडा द्या दुष्ट रिपुंना
डिवचला नाग रे खास डसे ॥५॥
सागर सैन्याचे मज दिसती
युद्धाविण परि दिसेना गती
भीष्म कर्ण हे अजिंक्य असती
ललाटी लिहिले काय असे ? ॥६॥
स्नेहे पार्था भीष्म पाहती
द्रोण दयाशिल पांडवाप्रती
कर्ण करिल परि प्रहार अंती
हे पार्थ बंधु त्या जाण नसे ॥७॥
सुयोधनाच्या दुःसंगाने
पार्था पाही वैरबुद्धिने
वेळ हीच त्या सत्य सांगणे
पाहील पांडवा स्नेहवशे ॥८॥
असे तुझा रे बंधू अर्जुन
सांगतेच त्याला मी भेटुन
येते मजसी तुझी आठवण
मातेला सुत हा श्वास असे ॥९॥
वाहत संग्रामाचे वारे
कर्णार्जुन ते रणी उतरले
कृष्णा तू मज शक्ती दे रे
हा यत्न योजिला मनी असे ॥१०॥