युधिष्ठिराचा निरोप
संजयचा निरोप ऐकल्यानंतर पांडवांकडील सर्व विचारमग्न झाले. संजयाच्या निरोपात राज्य परत देण्याविषयी कुठलेच आश्वासन नव्हते. युधिष्ठिराने संजयाला यावर आपले उत्तर सांगितले. ज्येष्ठांना कुशल निवेदन करण्यास सांगून धृतराष्ट्राला सांगितले की तुम्हीच पूर्वी राज्य दिले, तेव्हा आता ते पुन्हा आम्हाला देऊन सर्वांना शांतीने राहू द्यावे. दुर्योधनाला सांगितले की पांडवांनी आतापर्यंत खूप दुःखे सोसली आहेत तसेच अनेक अपराधही पोटात घातले आहेत. म्हणून आता तरी त्यांना त्यांचा न्याय्य वाटा परत मिळायला हवा. आमचेपाशी सामर्थ्य असूनही कुरुंचा वध न व्हावा म्हणून आम्ही सर्व अन्याय निमूटपणे सहन केले. यावर नीट विचार करुन दुर्योधन तू आमचे इंद्रप्रस्थाचे राज्य परत कर. शम व्हावा हीच आमची इच्छा आहे. समेटास आम्ही तयार आहोत. युद्ध टाळावे या हेतूने तू आम्हा पाच भावांना अविस्थल, वृकस्थल, मासन्दी इत्यादी निदान पाच गावे तरी दे ! हा शांतीसाठी माझा प्रस्ताव आहे. अन्यथा मी युद्धालाही तयार आहे.
युधिष्ठिराचा निरोप
संजया ऐकला निरोप कुरुराजाचा
परि कुठे दिसेना विचार मज न्यायाचा ॥धृ॥
युद्धाची भाषा कधीच ना मी केली,
इष्टाची प्राप्ती युद्धाविण जर झाली
तर कशास येइल विचार संग्रामाचा ? ॥१॥
मार्गावर असु दे कितीहि खळगे काटे
येऊ दे संकट पाण्डुसुतावर मोठे
परि ते न सोडतिल कधी हात नीतीचा ॥२॥
शांतीचे करितो दुर्योधन गुणगान
आम्हास सांगतो नको युद्ध दारुण
परि यत्न करी तो नित्य सैन्यवृद्धीचा ॥३॥
द्रव्याचा लोभी लोभी तो राज्याचा
चालला सदा तो मार्ग कपटनीतीचा
ह्या निरोपातही डाव गुपित ना कुठचा ? ॥४॥
जरि पृथ्वीवरले अगणित मिळणे वित्त
स्वर्गादी अथवा लोकहि होणे प्राप्त
तरी कधी न सोडिन मार्ग नृपा पुण्याचा ॥५॥
’शम उत्तम’ म्हणुनी आणला तू संदेश
परि कळे न मजला राजाचा उद्देश
ना कुठे शब्द तो इंद्रप्रस्थ राज्याचा ॥६॥
संजया सांगतो स्पष्ट मनोगत तुजला
मी तयार आहे सामाला, युद्धाला
मागणे फक्त द्या मला भाग राज्याचा ॥७॥
वनवास भोगला, केला पूर्ण करार
द्युतातिल सगळे देऊन मिटवा वैर
शब्दाचे पालन धर्म असे राजाचा ॥८॥
युद्धावर आणली पाळी जर का कोणी
मग गांडिव धाडिल सर्वांसी यमसदनी
दुष्टांना शासन हाच नियम सृष्टीचा ॥९॥
हे राज्य द्यायचे नसेल जर का अमुचे
तर ऐक मागणे माझेअ हे शेवटचे
हा उपाय माझा एकमेव शांतीचा ॥१०॥
दे पाच पांडवा पाचच गावे फक्त
वारणावतासह, राहु सदा संतुष्ट
या मार्गे होवो शेवट या कलहाचा ॥११॥