क्रांती 162
''पुढे आमचा विवाह झाला. प्रद्योतची फार निराशा होऊ नये म्हणून त्याच्या डोळयांआड इकडे सोनखेडीला येऊन मी विवाहबध्द झाले. परंतु प्रद्योतला ही गोष्ट कळल्यावर तो अदृश्य झाला. त्याला पकडलं, त्याच्या आधी अर्धा तास तो मला अकस्मता भेटला, तो मला 'बंगालमध्ये चल' म्हणत होता. 'या महाराष्ट्रीयाशी कशाला लग्न, बंगाल का ओस पडला होता? हा बंगाली तरुणांचा तू अपमान केलास', वगैरे बोलला. मीही त्याला खूप बोलले व त्याला डोळयांत पाणी आणून म्हटलं, ''प्रद्योत, तू माझा भाऊ हो. मला भाऊ नाही. तुला बहीण नाही. आपण बहिण-भाऊ होऊ.' प्रद्योतला शेवटी पश्चात्ताप झाला. त्यानंच माझ्या पतीवर निराशेमुळे हे संकट आणलं. त्यानं ते कबूल केलं व म्हणाला, ''तुझ्या पतीला मुक्त करीन तेव्हाच तोंड दाखवीन.'' प्रद्योत माझा भाऊ झाला आहे. कट, कारस्थान काही नाही. प्रद्योत वेडा झाला होता. निराश झाला होता. वेडयासारखं काहीतरी त्यानं केलं. त्यानं स्वतःच्या अश्रूंनी स्वतःचं वेड व पाप धुऊन टाकलं आहे. देवाच्या न्यायासनासमोर ती निर्दोष ठरेल. मानवी न्यायासनासमोरही ठरो. कोर्टाला माझी दया येवो. माझी पती व माझा भाऊ मला परत मिळोत.''
प्रद्योतने आपली जबानी दिली. तो म्हणाला, ''मायेनं सांगितलं त्यातील अक्षर न् अक्षर खरं आहे. ही मीच लिहिलेली पत्रं. मी इकडे येऊन पत्रं लिहित असे. बंगालीमधून लिहित असे. परंतु हस्ताक्षर जवळ जवळ एक आहे ही गोष्ट सरकारच्या हुषार डोक्यात आली पाहिजे होती. परंतु कट वगैरे शब्द दिसले की सरकारचा मेंदू वेडा होतो. साध्या गोष्टीही त्यांना मग दिसत नाहीत. सारं अशक्य त्याला शक्य वाटतं. मीच पोलिसांना निनावी पत्रं लिहिली होती की, 'महाराष्ट्रातील रामदास बंगालमधील दहशतवाद्यांशी पत्रव्यवहार करतो. ता पत्रव्यवहार पोस्टात पकडा. रामदासवर संकट यावं, मायेला दुःख व्हावं, त्यांच्या संसाराची धूळधाण व्हावी हाच माझा दुष्ट हेतू. वर्तमानपत्रात रामदासला अटक झाल्याचं वाचलं व मला आनंद झाला. माया घरी रडत असेल, तिचं पुन्हा मन वळवावं, तिला शिव्या द्याव्यात, म्हणून इकडे आलो. परंतु मायेच्या पुण्याईनं व पावित्र्यानं मी शुध्द झालो. या पवित्र भागीरथीनं या पतिताचा उध्दार केला. माझ्या जीवनात क्रांती झाली. पती होऊ पाहणारा प्रेमळ भाऊ झालो.''
''रामदास निर्दोष आहे. अपराधी फक्त मी. गुन्हेगार मी. मी क्षमा नाही मागत. मला चांगली शिक्षा करा. या लहरी व विकारी तरुणाला कारागृहात कोंडा.''
रमेशबाबूंची छोटी जबानी झाली. अक्षयकुमारांचीही झाली. अक्षयकुमार म्हणाले, ''प्रद्योत, माझा मुलगा. मायेवर त्याचं फार प्रेम. तिच्यासाठी तो झुरे. मायेचं लग्न झाल्यावर तो खोलीत तासन्तास बसून राही. कधी बोलत नसे. कधी हसत नसे. एके दिवशी तो निघून गेला. आम्हाला पत्ता नाही. आमची स्थिती काय झाली असेल तुम्ही कल्पना करू शकता. माझ्या मुलानं सारा अपराध कबूल केला आहे. त्याला पूर्ण पश्चात्ताप झाला आहे. सरकारनं शिक्षा करून त्याच्या जीवनात पुन्हा निराशा निर्मू नये. या दुःखीकष्टी पित्याचे अश्रू पाहून मुलाला क्षमा करावी, पित्याचा कोर्टाने दुवा घ्यावा.''
गुप्त पोलीस अधिकारी आनंदमोहन यांनीही प्रद्योतचं परिवर्तन समक्ष पाहिल्याचं सांगितलं. इतरही गोष्टींचं त्यांनी स्पष्टीकरण केलं. प्रद्योतच्या वडिलांनी हे अक्षर माझ्या मुलाचं, असं प्रामाणिकपणे एकदम सांगितलं वगैरे सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. सरकारतर्फे सांगण्यात आलं, की आम्ही खटला मागे घेतो. न्यायाधीश म्हणाले, ''रामदास निर्दोष आहे. प्रद्योतनं हेकारस्थान रचलं. परंतु एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन व त्याचं परिवर्तन लक्षात घेऊन त्यालाही सोडून देणं योग्य. त्यानं मानसिक शिक्षा आजपर्यंत भोगली ती पुष्कळ आहे. मायेचं मी कौतुक करतो. अक्षयकुमारांनी हे अक्षर माझ्या मुलाचं म्हणून एकदम सांगितलं या त्यांच्या सरळ स्वभावाचं मला कौतुक वाटतं. खटलाच काढून घेण्यात येत आहे. तेव्हा उगीच अधिक कशाला बोलू?''
कोर्टात टाळयांचा गजर झाला. 'दीनबंधू रामदास झिंदाबाद' अशी गर्जना नभाला भिडली. प्रद्योत व रामदास राम-लक्ष्मणाप्रमाणे परस्परांस भेटले. त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले होते. रामदासच्या गळयात अगणित हार पडले. किसानबंधू कामगारबंधू, विद्यार्थीसंघ, काँग्रेसकमिटया, ठिकठिकाणचे आश्रम, भगिनीमंडळं, व्यापारी संघ सर्वांनी हार घातले. रामदासची मिरवणूक काढयाचा कामगारांनी व शेतकर्यांनी हट्ट धरला. एका मोटारीत रामदास बसला. त्याच्या एका बाजूला माया होती, दुसर्या बाजूस प्रद्योत होता. मायेचे व प्रद्योतचे वडील होते. पाठीमागे दुसरी एक मोटार होती. तीत आनंदमोहन, मुकुंदराव, दयाराम, आनंदमूर्ती, शांता रामदासचे आई-बाप वगैरे बसले होते. प्रचंड मिरवणूक निघाली. मिरवणूक संपल्यावर रामदास म्हणाला, ''हजारो कामगार संप लढवीत आहेत; ते उपाशी आहेत. तरीही आपली भूक विसरून ते माझं स्वागत करण्यासाठी धावून आले. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांचा संप यशस्वी व्हावा अशीच मी तुरुंगात प्रार्थना करीत होतो. तुमच्या संपात भाग घेता यावा म्हणून सुटण्याची उत्कंठा होती. तुमच्या खांद्याशी खादा लावून मी उभा राहीन. परंतु शांतीनं काम करू या. तुम्ही इतके दिवस शांत राहिलात. धन्य तुमची. आम्हांला दोन दिवस उपवास पडले तर कोण अस्वस्थता येते ! किती किती आदळआपट आम्ही करतो ! तुमच्या सहनशीलतेला माझा प्रणाम आहे.''
रामदास सर्व पाहुण्यांसह सोनखेडीच्या घरी गेला. सर्वांनी आश्रम पाहिला. सर्वांना समाधान झाले.
''माये, मग काय? माझ्या प्रश्नाचं काय?'' आनंदमोहन म्हणाले.
''मी प्रद्योतशी बोलले. तो म्हणाला, ''ताई, तू करशील ते प्रमाण. मृणालिनी सुंदर आहे मुलगी, परंतु माझी एक अट आहे.'' माया म्हणाली.
''हुंडा पाहिजे का? किती हजार रुपये देऊ?'' त्यांनी विचारले.