क्रांती 38
प्रार्थनेच्या वेळेस स्वतः गुरुदेव येऊन बसले म्हणजे वातावरण कसे विजेने भारल्यासारखे वाटे आणि एखादे वेळेस स्वतःचेच एखादे प्रार्थनागीत ते म्हणत तेव्हाचा आनंद तर अमर असा असे. व्यक्तिमहात्म्य म्हणजे काय जादू आहे हे अशा वेळी कळे.
रामदास तेथे रंगला. मुकुंदरावही रंगले. तेथील विशाल ग्रंथालयात मुकुंदराव वाचीत बसत. रवींद्रनाथांना युरोपमध्ये अनेक पुस्तकविक्या मंडळांनी दिलेले भेट म्हणून मोलाचे ग्रंथ तेथे होते. इस्लामी संस्कृतीवर केवढा ग्रंथसंग्रह होता. चिनी, तिबेटी, जपानी संस्कृती तेथे अभ्यासावयास भरपूर साधने होती. रवींद्रनाथांबद्दल जगातील ज्या ज्या भाषेत काही लिहिले गेले ते सर्व एकत्र ठेवलेले तेथे आढळते. कात्रणाची ही अशी चिकटबुके तेथे किती तरी आहेत.
रामदासाने श्रीनिकेतनचा ग्रामीण वर्ग जोडला. कधी जवळच्या खेडयांतून त्यांना जावे लागे. कधी मॅजिक लँटर्न घेऊन जावयाचे. कधी स्वच्छता करावयास जावयाचे. कधी हिवतापासाठी कोयनेलच्या गोळया देण्यासाठी जावयाचे. बंगाली किसान कष्टी ! किती दरिद्री ! तो किती खंगलेला, रंजला, गांजलेला दिसे.
''या आपल्या तात्पुरत्या मलमपट्टीनं का या दरिद्री नारायणाचे प्रश्न सुटणार आहेत? त्याने शिक्षकांस प्रश्न केला.
''आपण दुसरं काय करणार?'' कालीचरण बाबू म्हणाले.
''हे दरिद्री लोक दाखवून क्रांती करा असं का नाही आम्हाला शिकवीत? या श्रमणार्यांना आधी खायला मिळेल अशी समाजरचना निर्माण करा असं का नाही आम्हाला सांगत?'' त्याने विचारले.
''तुम्हाला क्रांती करायची असली तरीही यांच्यात सेवाभावानं मिसळाल तेव्हाच करता येईल. तुमच्याबद्दल त्यांना विश्वास वाटू लागला, म्हणजेच उद्या तुम्ही काय सांगाल त्याप्रमाणे ते वागतील.'' शांतपणे कालीबाबू म्हणाले.
''ऋषी बंकीम यांनी तर 'साम्य' म्हणून पुस्तक ७५ वर्षांपूर्वीच लिहिलं. 'वंदे मातरम्' गीताचा अर्थ जर आपणास समजून घ्यावयाचा असेल तर आपणास साम्यवादी झालं पाहिजे. वंदे मातरम् म्हणावयाचे आणि साम्यवादाची उपेक्षा करावयाची हे त्या ऋषीला सहन नाही व्हायचं.'' रामदास म्हणाला. ''परंतु हा भारतीय साम्यवाद आहे. जगाचं केवळ अनुकरण म्हणजे मरण. भारतवर्ष अहिंसेनं साम्यवाद आणू पाहत आहे. प्रत्येक देशातील हवा निराळी. तेच फूल; परंतु निरनिराळया देशांत त्याच्या निरनिराळया छटा दिसतात. साम्यवादाचं फूल भारतात फुलेल, परंतु त्याचा रंग सौम्य व सात्त्वि असेल.'' कालीबाबूंनी सांगितलं.
रामदास दिलरुबाही शिकायला जाई. त्याला आजपर्यंत माहीत नव्हते की आपणास ही देणगी आहे. मनुष्याच्या जीवनाचा कोणता कप्पा कधी उघडेल याचा नेम नसतो. रात्री हातांत दिलरुबा घेऊन तो दूर जाऊन बसे व त्याचा अभ्यास करी. हळूहळू त्याची बोटे पडद्यावर बिजलीसारखी नाचू लागली व धनुकली कुशलतेने तारांवर फिरू लागली. हृदय उचंळबणारे सूर निघू लागले.