क्रांती 135
''रागावलेली असते तर असं दूध चोळीत बसले असते का? मांडीवर पाय घेऊन बसले असते का? दूध चोळणं रागावलेल्या माणसाच्या हातचं आहे की प्रेमळ मायेच्या माणसाच्या हातचं वाटतं आहे? खरंच सांगा हं.'' ती म्हणाली.
''इकडे ये म्हणजे सांगतो.'' तो म्हणाला.
''दूध चोळायचं आहे अजून.'' ती म्हणाली.
''पाहा बोलावतो तर येत नाही. रागातच आहेस तू अजून.'' तो म्हणाला.
''तेथूनच सांगा ना.'' ती म्हणाली.
''कानात सांगेन.'' तो म्हणाला.
''त्या दिवशीसारखं लहानमुलाप्रमाणे मोठयाने कुर्र करणार असाल, दडा बसायचा.'' ती हसून म्हणाली.
''कुर्र नाही करणार.'' तो म्हणाला. आपला कान त्याच्या तोंडाजवळ नेऊन माया म्हणाली, ''सांगा काय सांगायचं आहे ते.'' रामदासने ते तोंड पटकन आपल्या तोंडावर ठेवले.
''काय सांगितलं?'' त्याने विचारले.
''तुम्ही कारस्थानी महाराष्ट्रीय लोक धूर्त न लबाड. सर्व मुत्सद्देगिरी.'' ती म्हणाली.
'मुत्सद्देगिरीशिवाय पाहिजे असतं ते मिळत नाही. कारस्थान करून तुला मारलंबिरलं तर नाही ना ! त्याने हसून विचारले.
''मारलंत नाही तर काय? चांगलं गुदमरवलंत. आणखी मारायचं ते काय राहिलं?'' ती म्हणाली.
''परंतु हे गुदमरणं, हे मारणं का जगणं ! सांग. हे गुदमरणं म्हणजे अमृत पिणं, जीवनात प्रेम अमर करणं. तुला नाही ही गंमत आवडत?'' त्याने विचारले.
''आणखी चोळू का दूध?'' तिने विचारले.
''नको तुझे हात दुखायला लागतील व मग ते मला चोळायला लागतील.'' तो म्हणाला.
''तुमचं चोळणं म्हणजे कुस्करणं. लावू का आणखी? नीट सांगा.'' तिने पुन्हा विचारले.
''हात थकले नसतील तर लाव थोडं.'' तो म्हणाला.
''तुमच्या पायांची सेवा करून हात उलट बळकट होतील. हाताचा थकवा जाईल. गरिबांसाठी वणवण करणारे हे पाय, गरिबांची सुखदुःखं जाणून घेण्यासाठी हिंडणारे हे पाय. या पायांची सेवा करून हात का थकतील? जन्मोजन्मी हे पाय मी चुरीत बसेन, त्यांना तेल-दूध लावीन बसेन.'' असे म्हणून मायेने आपल्या मांडीवरील पायावर आपले मस्तक ठेवले.
''माया, पुरे. कोणी तरी हाक मारतं आहे. जा, दार उघड जा.''तो म्हणाला.