Get it on Google Play
Download on the App Store

क्रांती 2

लग्न करा असे श्रीनिवासरावांस पुन्हा कधी कोणी बोलले नाही. परंतु श्रीनिवासरावांची इस्टेट? मिनीचे लग्न करून का कोणाला घरजावई करणार व त्याला सार्‍या इस्टेटीचे बक्षीसपत्र देणार? का कोणाला दत्तक घेणार? दत्तक घेण्यासंबंधी सूचना त्यांच्या कानावर येत. परंतु ते लक्ष देत नसत. एकदा तर ते म्हणाले, ''एखादा मुलगा दत्तक घेण्यापेक्षा एखाद्या संस्थेला सारी इस्टेट का देऊ नये? एकदा एक मिशनरी म्हणाला होता,''आमच्याकडे दत्तकपध्दती नाही, म्हणून कोटयावधी फंड आमच्या संस्थांना मिळू शकतो.'' परंतु आमच्याकडे हे दत्तकाचे खुळ आहे. परंपरा चालविणे पवित्र खरे, परंतु काळवेळही पाहिला पाहिजे. आज देशाच्या कल्याणासाठी झटणार्‍या शेकडो संस्था उभ्या राहत आहेत. या देशाचा फाटका संसार सुधारण्यासाठी त्या खटपट करीत आहेत. त्या संस्था मरू देणे म्हणजे पूज्य पूर्वजांशीही द्रोह आहे. पूर्वजांची परंपरा चालविण्यासाठी आधी देश जगला पाहिजे आणि म्हणून त्या देशाला जगवू पाहणार्‍या संस्था जगविल्या पाहिजेत. खादी संघ, हरिजनसेवक संघ, हिंदी-प्रचार-समिती, गोरक्षण, व्यायामप्रसार, साक्षरताप्रसार, शेकडो संस्था आहेत; कोणाला आहे त्याची पदोपदी आठवण? माझी इस्टेट मी तिथे का देऊ नये? आणि ही इस्टेट माझी तरी कशी? काय माझा अधिकार? ही शेतभाते कोणाची? शेतकर्‍यांची; ती त्यांना मी का देऊ नयेत? ज्यांना जमीन नाही अशा हरिजनांना ती का देऊ नयेत? माझे, काय आहे माझे? संपत्ती गादीवर लोळून निर्माण करता येत नसते.''

''व्यापारी हजाराचे दहा हजार, लाखाचे दहा लाख गादीवर बसून करतात. आम्हाला दिसतं.'' कोणी म्हणत.

परंतु श्रीनिवासराव सांगत, ''ते लाखाचे दहा लाख करीत असतील. परंतु त्याचा अर्थ काय? दुसर्‍याच्या खिशातील दहा लाख त्यांनी कमी केले. जगातील संपत्तीत त्यांनी भर घातली का? संपत्ती त्यांच्या वहीत होती. ती यांच्या वहीत आली. एखाद्या शेटजीला एक गिरणी उभारून तेथे बसू दे. ते एक धुराचे नळकांडे करू दे सुरू, गिरणीत नऊ-नऊ तास काम करून मरणारे कामगार तिथे नसतील तर संपत्ती होईल का निर्माण? शेतात श्रमून-राबून शेतकरी कापूस, शेंगा, धान्य न निर्मील तर व्यापारी गाद्यांवर बसून भाव करीत बसले तरी का संपत्ती तिजोरीत येणार आहे? संपत्ती श्रमातून निर्माण होते. ती श्रम करणार्‍याजवळ राहत नाही. ती लुबाडली जाते, अन्यत्र नेली जाते, ते श्रमणारे उपाशी राहतात. खरोखरीच ही माझी इस्टेट म्हणायला मला लाज वाटते. एखादे वेळेस हा मोठा सुंदर वाडा मला लाखो जीवांच्या संसाराची होळी करून बांधला आहे असं वाटतं. क्षणात हे सारं वैभव भिरकावून द्यावं असं वाटतं. परंतु मोह आहे. मोह तोडणं महाकर्म कठीण !''


एखादा मृत्युंजय शिवशंकरच, वैराग्याचे भस्म अंगाला फासलेला, ज्ञानगंगा ज्याच्या मस्तकातून स्रवत आहे, शीलाचा चंद्रमा ज्याच्या भाळी मिरवत आहे, पवित्र निश्चयाचा तिसरा डोळा ज्याचा उघडलेला आहे, असा तो योगियांचा राणाच श्रीनिवासांच्या रूपाने बोलत आहे असे त्या वेळेस वाटे. त्यांच्या डोळयांत त्या वेळेस एक अशा प्रकारचे तेज चमके की, दुसर्‍यांच्या जीवनास थोडेफार तरी पेटविल्याशिवाय राहत नसे.

श्रीनिवासरावांच्या हृदयाचा थांग लागणे कठीण. त्यांना मिनीचे बंधन नसते तर ते केव्हाच हिमालयात गेले असते. लाकडे पोखरणार्‍या भ्रमराला एक कोमल कमळ गुंतवून ठेवते, पकडून ठेवते, कोंडून ठेवते. मिनीची ती जीवनकळी, त्या कलिकेसाठी श्रीनिवासराव जगत होते. ते मिनीची सारे करायचे. मिनीची सेवा करताना त्यांना धन्य वाटे. मातृप्रेम व पितृप्रेम या दोहोंचा आनंद ते मिनीला देत. ''मिने, मी तुझे केस विंचरतो. त्यात फूल खोवतो.'' ते म्हणावयाचे. मीना गोड हसे, ''मिने, तुला भरवू? मोठी झाली  म्हणून काय झालं? देऊ का तुला भात कालवून?'' असे म्हणायचे. मिनी गोड हसे.

क्रांती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
क्रांती 1 क्रांती 2 क्रांती 3 क्रांती 4 क्रांती 5 क्रांती 6 क्रांती 7 क्रांती 8 क्रांती 9 क्रांती 10 क्रांती 11 क्रांती 12 क्रांती 13 क्रांती 14 क्रांती 15 क्रांती 16 क्रांती 17 क्रांती 18 क्रांती 19 क्रांती 20 क्रांती 21 क्रांती 22 क्रांती 23 क्रांती 24 क्रांती 25 क्रांती 26 क्रांती 27 क्रांती 28 क्रांती 29 क्रांती 30 क्रांती 31 क्रांती 32 क्रांती 33 क्रांती 34 क्रांती 35 क्रांती 36 क्रांती 37 क्रांती 38 क्रांती 39 क्रांती 40 क्रांती 41 क्रांती 42 क्रांती 43 क्रांती 44 क्रांती 45 क्रांती 46 क्रांती 47 क्रांती 48 क्रांती 49 क्रांती 50 क्रांती 51 क्रांती 52 क्रांती 53 क्रांती 54 क्रांती 55 क्रांती 56 क्रांती 57 क्रांती 58 क्रांती 59 क्रांती 60 क्रांती 61 क्रांती 62 क्रांती 63 क्रांती 64 क्रांती 65 क्रांती 66 क्रांती 67 क्रांती 68 क्रांती 69 क्रांती 70 क्रांती 71 क्रांती 72 क्रांती 73 क्रांती 74 क्रांती 75 क्रांती 76 क्रांती 77 क्रांती 78 क्रांती 79 क्रांती 80 क्रांती 81 क्रांती 82 क्रांती 83 क्रांती 84 क्रांती 85 क्रांती 86 क्रांती 87 क्रांती 88 क्रांती 89 क्रांती 90 क्रांती 91 क्रांती 92 क्रांती 93 क्रांती 94 क्रांती 95 क्रांती 96 क्रांती 97 क्रांती 98 क्रांती 99 क्रांती 100 क्रांती 101 क्रांती 102 क्रांती 103 क्रांती 104 क्रांती 105 क्रांती 106 क्रांती 107 क्रांती 108 क्रांती 109 क्रांती 110 क्रांती 111 क्रांती 112 क्रांती 113 क्रांती 114 क्रांती 115 क्रांती 116 क्रांती 117 क्रांती 118 क्रांती 119 क्रांती 120 क्रांती 121 क्रांती 122 क्रांती 123 क्रांती 124 क्रांती 125 क्रांती 126 क्रांती 127 क्रांती 128 क्रांती 129 क्रांती 130 क्रांती 131 क्रांती 132 क्रांती 133 क्रांती 134 क्रांती 135 क्रांती 136 क्रांती 137 क्रांती 138 क्रांती 139 क्रांती 140 क्रांती 141 क्रांती 142 क्रांती 143 क्रांती 144 क्रांती 145 क्रांती 146 क्रांती 147 क्रांती 148 क्रांती 149 क्रांती 150 क्रांती 151 क्रांती 152 क्रांती 153 क्रांती 154 क्रांती 155 क्रांती 156 क्रांती 157 क्रांती 158 क्रांती 159 क्रांती 160 क्रांती 161 क्रांती 162 क्रांती 163 क्रांती 164 क्रांती 165 क्रांती 166 क्रांती 167 क्रांती 168 क्रांती 169 क्रांती 170 क्रांती 171 क्रांती 172 क्रांती 173