क्रांती 28
ते मित्र सचिंतपणे अंथरुणावर पडले. दयारामला झोप येईना; त्याचे डोळे सारखे भरभरून येत होते.
दुसरा दिवस उजाडला. दयाराम व माणक आज गाणी म्हणत हिंडायला गेले नाहीत, आश्रमातच कामं करीत होते; पार्थ व चुडामण मागावर होते, हिरा खादीची ठाणं नीट ठेवीत होता, तो बायका आल्या. सुताच्या राशी घेऊन आल्या.
''आता सूत सध्या नको आई.'' हिरालाल म्हणाला.
''असे नको रे बोलू भाऊ !'' जानकी म्हणाली.
''आज हिरादादा हसत नाही, बोलत नाही.'' तुळशी म्हणाली.
''हिरादादा, पाणी रे का डोळयाला तुझ्या? आमच्या डोळयांचं पाणी तुम्ही पुसता, तुमच्या कोण पुशील?'' यमनी म्हणाली.
''आश्रमात खादी पडून आहे. श्रीमंत लोक घेत नाहीत. ते विद्यार्थी घेत नाहीत. पैसे कोठून आणू? व्यापार्यांना सांगितलं दिवाळीसाठी तक्क्ये, लोड, दुकानातील गाद्या यांचे वरचे अभ्रे तरी खादीचे करा. परंतु कोणी ऐकेना. कोठून देऊ पैसे? या डोळयांतील अश्रूंची माणिकमोती का होत नाहीत?'' हिरा दुःखाने म्हणाला.
''हिरा, काही कर. परंतु आजचा दिवस घे. मग महिना पंधरा-दिवस नाही येणार. पोरी दिवाळीला घरी येणार. दोन दिडक्या घरात असू देत.'' यशोदा म्हणाली.
''हिरा, माझ्या घरात दिवा कधीच नसतो. म्हटलं, यंदा दिवाळीत लावू दोन. घे रे राजा सूत.'' सुंदरा रडत म्हणाली.
''हिरा, पोरं आज उपाशी आहेत माझी. नाही का रे दया येत तुला?'' अन्नपूर्णेने विचारले.
''मला कोणी विकत घेतलं असतं तर स्वतःला विकून मी दिले असते पैसे. परंतु आम्हाला कोण घेणार विकत?'' हिरा म्हणाला.
दयाराम बाहेर आला.
''दयाराम, तू तरी दया कर.'' सार्या हात पसरून म्हणाल्या.
''उद्या या. उद्या पैसे देऊ.'' दयाराम म्हणाला.
''कोठून आणणार पैसे दया?'' हिरालालने विचारले.
''दरोडा घालून, चोरी करून, संतांना जेवण घालता यावं म्हणून कबिरानं चोरी केली.'' दयाराम गंभीरपणे म्हणाला.
''परंतु कमाल-त्याचा मुलगा, तो फाशी गेला. सुळावर त्याला चढवण्यात आलं.'' हिरा शांतपणे बोलला.
''मीही फाशी जाईन. यांचे अश्रू पुसता येत नाहीत, तर जगून काय करायचं?'' दया म्हणाला.
''असं नको रे बोलू; तुम्ही जगाल तर आम्ही जगू. आम्ही उपाशी मरू; परंतु असं नका काही करू. तुम्ही जगा हो राजांनो. घरदार सोडून आमच्यासाठी कामं करता !'' तुळशी म्हणाली.