Get it on Google Play
Download on the App Store

क्रांती 70

१२. रडू नका उठा

मुकुंदराव यात्रेवरून परत आले. ते रामपूरला आले व तेथून सोनखेडीस गेले. दयाराम, चुडामण, हिरालाल, पार्थ, माणिक सर्वांचे काम चालले होते. आश्रमात निघणारी खादी सारी खपत असे. रामदास आल्यावर व्याप वाढवावयाचा असे त्यांनी ठरविले होते, त्या आश्रमात सोनखेडीचे किसान, सोनखेडीच्या आयाबाया वेळ मिळेल तेव्हा येत. सूत कातीत वा चर्चा करीत. ''नुसती चर्चा नका करीत बसू. हाताने काम करा व तोंडाने चर्चा करा. हाताने अर्चा व मुखाने चर्चा. हातात काम, मुखात नाम. स्वच्छ विचार म्हणजे रामनाम. ज्ञानब्रह्म, ज्ञान म्हणजेच ईश्वर. ईश्वराची याहून सुंदर व्याख्या कोणीही केली नाही. बसा, हा घ्या चरखा, व विचारा प्रश्न'' असे दयाराम म्हणावयाचा.

पुष्कळ वेळा शेतकरी विचारीत, ''हे सूतबीत ठीक आहे; परंतु आम्हाला मुख्य दोन घुशी आहेत. सरकार व सावकार. शेतात पिको न पिको, शेतसारा भरावाच लागतो. म्हातारे शेतकरी सांगतात की, तहशील तिपटीनं वाढले. आमच्या सोनखेडी गावचा शेतसारा पूर्वी २२०० होता. आज ७००० आहे. तिपटीहून अधिक वाढ.  परंतु आम्हा शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढलं का? मागं एकदा मोठी लढाई झाली. शेतकर्‍यांच्या मालाला जरा भाव चढला. सरकारनं एकदम तहशील वाढविले. आज पंधरा वर्षं भाव घसरले आहेत. परंतु तहशील कायम ते कायम. शेती परवडत नाही. सारा खर्च शेतकरी टिपून ठेवील तर आतबट्टयाचा कारभार चालला आहे असं दिसेल. भाव वाढले होते तेव्हा शेतकर्‍यानं कर्ज काढली. आशा अशी की, पुढील वर्षी सहज फेडू. जरा लग्न थाटानं करी, कोठे शेतात विहीर खणी; परंतु भाव गडगडले. कर्ज मात्र पूर्वीचं, व्याजाचा दरही पूर्वीचा. व्याज फिटत नाही. कर्ज वाढतच चाललं. एक-एक गाव सावकाराचं होत आहे. शेतकरी नावाचा धनी. खरा धनी सावकार, कधी लिलाव करील त्याचा नेम नाही. नेहमी धास्ती. शेतकर्‍याला मरणाची धास्ती वाटत नाही. परंतु या लिलावाची, जप्तीची धास्ती वाटते; अब्रू केव्हा घेतली जाईल, घरातील माणसं केव्हा बाहेर काढावी लागलीत काही नेम नाही. नवीन वर्ष आलं, पुन्हा पेरणीचे दिवस आले की पुन्हा बी-बियाणासाठी सावकाराकडं, मालकाकडं जावं लागतं. १२ रुपयांचे बी ३० रुपयांस घ्यावं लागतं. शहरातले शहाणे आम्हाला म्हणतात की, 'बियापुरतं का ठेवीत नाहीत?' कसं ठेवायचं? घरात खायला पुरत नाही, चार महिन्यांपुरतं उरत नाही. तर बियाला कोठून ठेवायचं? तहशील भरण्यात, खंड भरण्यात, थोडं फार व्याज देण्यात सारं जातं. खळयात माल आला नाही तो सावकार गाडी घेऊन उभा. पाटील. तलाठी तगादा लावण्यास उभे. शेतकर्‍यांची अशी कुतरओढ, अशी लांडगेतोड चाललेली असते. सूत किती आधार देणार? आमचे खंड कमी झाले पाहिजेत, तहशील भरमसाठ वाढलेले कमी झाले पाहिजेत, आमचे कर्ज रद्द झाले पाहिजे, एरव्ही आम्ही जगणार नाही, तगणार नाही.''

किसानांच्या कहाण्या ऐकून दयाराम दुःखी होई. पार्थ संतापाने पेटे, चुडामण चवताळे, हिरालाल हात कपाळाला लावी, माणिक मान खाली घाली. ते सेवक काय सांगणार? त्यांनी एक काम अंगावर घेतले होते. सर्वत्र लुडबूड करून कसे चालणार?

''तुम्ही किसानांनी संघटना केली पाहिजे. एकावर जप्ती आली तर दुसरे त्याची मजा बघायला जमता. सावकारानं एकाकडून शेत काढलं तर दुसरे दहा, 'मला द्या' करीत त्याचे पाय चाटता. तुम्हीच स्पर्धेनं त्याचा खंड वाढविता. दुसर्‍याला बोल लावणं सोपं. स्वतःचा दामही  खोटा आहे हे पाहिलं पाहिजे. किसान सारा एक झाला पाहिजे. कर्जाचा हिशोब नीट झाला पाहिजे, तहशील कमी झाले पाहिजेत, खंड कमी झाला पाहिजे, म्हणून तुम्ही उठलं पाहिजे. येथे आश्रमात रडून काय होणार?'' दयाराम सांगे.

''वास्तविक कर्ज रद्दच झालं पाहिजे. मागे मुकुंदराव म्हणाले होते की, सरकारच्या एका आर्थिक चौकशी समितीनंच असं स्वच्छ लिहिलेलं आहे की, हिंदी शेतकरी कर्ज कधीही फेडू शकणार नाही, ते एक दिवस सारं रद्द केलं पाहिजे.'' हिरालाल म्हणाला.

''समजा, रद्द नका करू. परंतु किती व्याज पोचलं त्याचा हिशेब हवा करायला आणि तो हिशोब करताना शेकडा 3 पेक्षा अधिक व्याजाचा दर धरणं पाप वाटलं पाहिजे. एवढं साम्राज्य सरकार कर्ज काढतं. त्याला 2 टक्के दरानं कोटयवधी रुपये कर्ज मिळतं. परंतु दरिद्री शेतकर्‍याला व्याजाचा दर म्हणे १२ टक्के, २५ टक्के, ५० टक्के ! साम्राज्य सरकारपेक्षा का किसान श्रीमंत आहे? किसानांच्या पतीवरच साम्राज्य सरकारला कर्ज मिळतं. परंतु त्या किसानांना मात्र भेटत नाही स्वस्त दरानं कर्ज.'' पार्थ म्हणाला.

क्रांती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
क्रांती 1 क्रांती 2 क्रांती 3 क्रांती 4 क्रांती 5 क्रांती 6 क्रांती 7 क्रांती 8 क्रांती 9 क्रांती 10 क्रांती 11 क्रांती 12 क्रांती 13 क्रांती 14 क्रांती 15 क्रांती 16 क्रांती 17 क्रांती 18 क्रांती 19 क्रांती 20 क्रांती 21 क्रांती 22 क्रांती 23 क्रांती 24 क्रांती 25 क्रांती 26 क्रांती 27 क्रांती 28 क्रांती 29 क्रांती 30 क्रांती 31 क्रांती 32 क्रांती 33 क्रांती 34 क्रांती 35 क्रांती 36 क्रांती 37 क्रांती 38 क्रांती 39 क्रांती 40 क्रांती 41 क्रांती 42 क्रांती 43 क्रांती 44 क्रांती 45 क्रांती 46 क्रांती 47 क्रांती 48 क्रांती 49 क्रांती 50 क्रांती 51 क्रांती 52 क्रांती 53 क्रांती 54 क्रांती 55 क्रांती 56 क्रांती 57 क्रांती 58 क्रांती 59 क्रांती 60 क्रांती 61 क्रांती 62 क्रांती 63 क्रांती 64 क्रांती 65 क्रांती 66 क्रांती 67 क्रांती 68 क्रांती 69 क्रांती 70 क्रांती 71 क्रांती 72 क्रांती 73 क्रांती 74 क्रांती 75 क्रांती 76 क्रांती 77 क्रांती 78 क्रांती 79 क्रांती 80 क्रांती 81 क्रांती 82 क्रांती 83 क्रांती 84 क्रांती 85 क्रांती 86 क्रांती 87 क्रांती 88 क्रांती 89 क्रांती 90 क्रांती 91 क्रांती 92 क्रांती 93 क्रांती 94 क्रांती 95 क्रांती 96 क्रांती 97 क्रांती 98 क्रांती 99 क्रांती 100 क्रांती 101 क्रांती 102 क्रांती 103 क्रांती 104 क्रांती 105 क्रांती 106 क्रांती 107 क्रांती 108 क्रांती 109 क्रांती 110 क्रांती 111 क्रांती 112 क्रांती 113 क्रांती 114 क्रांती 115 क्रांती 116 क्रांती 117 क्रांती 118 क्रांती 119 क्रांती 120 क्रांती 121 क्रांती 122 क्रांती 123 क्रांती 124 क्रांती 125 क्रांती 126 क्रांती 127 क्रांती 128 क्रांती 129 क्रांती 130 क्रांती 131 क्रांती 132 क्रांती 133 क्रांती 134 क्रांती 135 क्रांती 136 क्रांती 137 क्रांती 138 क्रांती 139 क्रांती 140 क्रांती 141 क्रांती 142 क्रांती 143 क्रांती 144 क्रांती 145 क्रांती 146 क्रांती 147 क्रांती 148 क्रांती 149 क्रांती 150 क्रांती 151 क्रांती 152 क्रांती 153 क्रांती 154 क्रांती 155 क्रांती 156 क्रांती 157 क्रांती 158 क्रांती 159 क्रांती 160 क्रांती 161 क्रांती 162 क्रांती 163 क्रांती 164 क्रांती 165 क्रांती 166 क्रांती 167 क्रांती 168 क्रांती 169 क्रांती 170 क्रांती 171 क्रांती 172 क्रांती 173