क्रांती 93
''आमचे हात हलके असतात. सुकुमार असतात. परंतु आम्ही पुरुषांना घट्ट बांधून ठेवतो.'' माया म्हणाली.
''पुरुषांच्या जीवनवृक्षाची स्त्रिया म्हणजे मुळे. मुळे झाडाला जखडून ठेवतात, म्हणून तर वृक्षाचा माथा उंच जातो, फुलाफळांनी शोभतो. मोठा पूर आला तर आजूबाजूची माती निघून जाते; परंतु मुळे सोडीत नाहीत, ती शेवटपर्यंत चिकटून असतात.'' रामदास म्हणाला.
''ते वृक्षही कृतज्ञतेनं आपली फुलं, तो पुष्ककिरीट मुळांच्या पायांवर अर्पण करतात. मुळांच्या चरणावर ते पुष्पवृष्टी करतात.'' माया म्हणाली.
''माया, खेडोपाडी म्हणजे हिंदुस्थानची मुळं. सर्वांनी आपलं वैभव या मुळांच्या चरणी वाहिलं पाहिजे. श्रीमंतांनी आपली श्रीमंती, बुध्दिमंतांनी आपली बुध्दी, कलावंतांनी आपली कला या खेडयांच्या चरणी वाहिली पाहिजे.'' रामदास म्हणाला.
''मी खेडयातील जनतेत जाईन व त्यांना संगीत ऐकवून क्षणभर दुःखाचा विसर पाडीन.'' रामदास म्हणाला.
''माये, तू गरिबीत आनंद मावशील?'' एकदम त्याने नवीन प्रश्न केला
''तुमच्या हृदयासारखं श्रीमंत हृदय जर मिळेल तर कुबेराची संपत्तीही मी तुच्छ मानीन.'' माया म्हणाली.
''कधी-कधी माझ्या मनात येतं की, बाबांच्या पश्चात जी इस्टेट मला मिळणार ती सारी देऊन टाकावी. गरिबांचं गरिबाला मिळू दे. आमचा मोठा वाडा आहे. त्याचं सुंदर आरोग्यधाम बनवू. तेथे रोग्यांसाठी खाटा ठेवू. प्रसूतीसदन ठेवू. डॉक्टर व दाया राहतील. बाबांची सारी धनदौलत या कामी लावून द्यावी. स्वतः एखाद्या झोपडीत राहावे व जीवनातील त्यागाचं संगीत अनुभवावं.'' रामदास पुढील बेत सांगत होता.
''मायेला जिंकणारा रामदास बंगल्यात नसेच राहत. तो घळीत राहत असे.'' माया म्हणाली.
''तुला काय वाटत असतं?'' त्याने विचारले.
''मी साध्या कागदावर सुंदर रंग भरायला शिकले आहे. साधा एक कोळशाचा तुकडा व त्यानं नयनमनोहर मूर्ती रेखाटावयास मी शिकले आहे.'' माया म्हणाली.
''माया, मला जायचं आहे. फणीबाबूंनी आज रसगुल्ले खायला त्यांच्या खोलीत बोलावलं आहे.'' रामदास म्हणाला.
''खा हं एकटे-एकटे.'' ती हसत म्हणाली.
''तुझी आठवण करून खाईन.'' तो म्हणाला.
''माझं पोट भरेल.'' ती म्हणाली.