क्रांती 96
१६. पित्याची इच्छा पूर्ण केली
रामदास वडिलांच्या जवळ बसला होता. गोविंदराव अत्यंत क्षीण झाले होते. त्यांच्याने फार बोलवतही नसे. परंतु जेव्हा काही बोलत, तेव्हा ते सारे देण्याघेण्याविषयीच असे. मरणाकडे जातानाही पैशाचेच स्मरण होत होते. जन्मभर ज्या देवतेची उपासना त्यांनी केली, तिचेच स्मरण ते करीत होते. रात्रंदिवस कमरेला किल्ल्या असावयाच्या. किल्ली म्हणजे देव, किल्ली म्हणजे पंचप्राण. ती लहानशी किल्ली ! किती जणांचे प्राण तिने तिजोरीत कोंडून ठेवले होते. ती किल्ली म्हणजे विषवल्ली होती.
''बाबा, त्या किल्ल्या बोचत असतील कमरेला, जरा दूर ठेवा ना त्या आता.'' रामदास म्हणाला.
''मी काही मरणार नाही इतक्यात. डॉक्टर काय म्हणाले? अद्याप तीन-चार महिने काढतील असं काही तरी म्हणाले नाही का? ती प्रॉमिसरी मुदीतबाहेर जाईल हो. त्या मुनीमजीचं नसतं लक्ष. जा, त्यांना आठवण दे. येथे माझ्याजवळ कशाला बसला आहेस? मी जिवंत आहे तोपर्यंत सारं नीट समजावून घे. नीट कारभार करू लाग. म्हणजे मी सुखानं मरेन.'' गोविंदराव म्हणाले.
''बाबा, आता राम म्हणा ना. जरा देवाला आठवा ना. संसाराचा विसर पडू दे.'' रामदासने प्रेमाने सांगितले.
कर्तव्य करीत मरावं असं तुम्हीच ना म्हणता? मरताना म्हणे 'अमका' माझा देश, माझा देश' करीत मेला. मीसुध्दा मरताना 'माझे पैसे, माझे पैसे' करीत मेलो तर त्यात काय वाईट? ज्याचं त्याचं जीवनकार्य निरनिराळं. त्या त्या बाबतीत मरेपर्यंत त्यानं दक्ष राहिलं पाहिजे. रामदास, तुझं लक्षण काही ठीक नाही.'' गोविंदराव म्हणाले.
''काय करू बाबा?'' त्याने विचारले.
''तू त्या मुकुंदरावांची संगत सोडून दे. ते शेतकर्यांना चिथावीत आहेत. शेतकरी माजोरे होत आहेत. दाणा घालीत नाहीत. व्याज भरीत नाहीत. मुकुंदराव म्हणजे सावकारांचं, जमीनदारांचं मरण.'' ते म्हणाले.
''आणि सावकार व जमीनदार कोटयवधी किसानांचं मरण. बाबा, 'एक मरो परंतु लाखो जगोत' असं नको का म्हणायला? मूठभर सावकारांनी, जमीनदारांनी, श्रीमंतांनी चैन करावी, आणि लाखांनी का ती चैन चालू राहावी म्हणून रात्रंदिवस उपाशीपोटी मरावं? मुकुंदराव शेतकर्यास खरा धर्म शिकवीत आहेत. बांडगुळांना पोसणं अधर्म आहे.'' रामदास म्हणाला.
''आम्ही का बांडगुळं?'' पित्याने विचारले.
''नाही तर काय? वृक्षाच्या रसावर ती बांडगुळं पोसतात व वृक्षाला नष्ट करतात. परंतु वृक्ष मेला तर आपणही मरू हे त्यांच्या लक्षात येत नाही. गरिबांच्या श्रमावर आपण जगतो. आपण परपुष्ट आहोत.'' रामदास म्हणाला.
इतक्यात बाहेर ओटीवर बाचाबाची चाललेली ऐकू आली. रामदास उठून बाहेर आला.
''आत वडील आजारी. काय आरडाओरड? तुम्हाला जरा हळू नाही का बोलता येत?'' रामदासाने मुनिमजींना विचारले.
''अहो, हळू बोलून का हे लोक ऐकणार आहेत? येथे दिलरुबा नाही वाजवायचा, येथे ढोल वाजवायचा. त्यांच्याजवळ हळू बोलेन, गोड बोलेन तर हे डोक्यावर बसतील. हळू बोलण्याला ते दुबळेपणा मानतात. जो सावकार मोठयानं बोलेल त्याचा वसूल येतो. हळू बोलणारा रडत बसतो.'' मुनिमजी म्हणाले.
''पण काय आहे याचं म्हणणं?'' रामदासाने विचारले.
''म्हणतो की, यंदा कोठून देऊ व्याजाचे पैसे? यंदा मुळीच काही पिकलं नाही. घरात भरून ठेवतात, सावकाराला नाही म्हणतात. ते काही नाही. याच्यावर फिर्याद केलीच पाहिजे. मालक तसं म्हणत होते.'' मुनिमजींनी सांगितले.