क्रांती 95
रामदासने सर्वांचा निरोप घेतला. कालीचरणबाबू, फणीबाबू यांच्याकडे तो जाऊन आला.
''रामदास, तुझे वडील बरे होऊ देत, पुन्हा ये. प्रकृती कळव. तुझ्यामुळे मुकुंदरावही येथे आले. विचारांची मेजवानी मिळाली. तुझा स्वभावही गोड, परोपकारी.'' फणीबाबू म्हणाले.
''महापुराच्या वेळेस तू फार चांगलं काम केलंस असं मुद्दाम लिहून आलं आहे. त्या महाराष्ट्रीय मजुराच्या शर्टची सत्यकथा वाचून गुरुदेवांचा डोळयांतून पाणी आलं.'' कालीचरण म्हणाले.
रामदासच्या मित्रांनी त्याला अल्पोपहाराला बोलावलं होतं. गिरीश म्हणाला, ''रामदास, ही काही आनंदाची वेळ नाही. तू चिंतेत आहेस. परंतु न जाणो काय होईल ते. काही वेडेवाकडं झालं व तू पुन्हा येऊ न शकलास तर? म्हणून हा प्रसंग योजला आहे.
अल्पोपहार झाला. रामदासने सर्वांचा निरोप घेतला. तो मायेच्या खोलीत गेला. माया रडत होती.
''रामदास, कधी भेटशील तू परत?'' तिने विचारले.
''देवाची इच्छा असेल तेव्हा.'' तो म्हणाला.
''मी तुला काय देऊ?'' तिनं विचारलं.
''देण्याचं काही शिल्लक राहिलं नाही. आपण परस्परांना कर्ज दिलं आहे.'' तो म्हणाला.
''खरंच का?''
''हो.''
''बंगाल व महाराष्ट्र यात किती अंतर?'' तिने विचारले.
''अनंत.'' तो म्हणाला.
''अनंत?'' तिने दुःखाने विचारले.
''माया, अनंत म्हणजे शून्य ब्रह्माला दोन्ही विशेषणे लावतात.'' तो म्हणाला.
''पुरुषांना श्लोक आवडतात. बायकांना नाही आवडत. आम्हाला साधं सरळ उत्तर पाहिजे असतं. आडपडदा नको.'' ती म्हणाली.
''माया !'' त्याने हाक मारली.
''काय?'' तिने विचारले.
''मी बंगालचा आत्मा घेऊन जात आहे. कुडी येईल मागून.'' तो म्हणाला.
''आत्म्याला जरूर पडली तर. आत्मा अनंतात बुडाला तर कुडीची काय पर्वा !'' ती म्हणाली.
''माया, मी तुझा आहे ना?'' त्याने विचारले.
''हो, आणि मी कोणाची?'' तिने विचारले.
रामदासने तिचा हात हातात घेतला व त्यावर लिहिले, ''माझी.''
''पुन्हा लिहा, समजलं नाही.'' ती म्हणाली.
त्याने तिचा हात दाबला. ''आता समजलं? प्रेमाला प्रकट भाषा सहन होत नसते; ती त्याला समजत नाही. त्याला मुकी भाषा, गूढ भाषा आवडते.'' तो म्हणाला.
रामदास गेला. विश्वभारतीतून गेला. त्याने स्वतःच्या जीवनाचे तेथे संगीत मिळविले व दुसर्याच्या जीवनातही ओतले. बंगाल व महाराष्ट्र यांचे त्याने एक प्रकारे लग्न लावले.