क्रांती 136
माया बाहेर आली. तिने दार उघडले. तो तेथे काही पोलीस व स्वतः फौजदार उभे. माया चकित झाली.
''कोण पाहिजे?'' तिने विचारले.
'दीनबंधू रामदास.'' फौजदार म्हणाले.
''काही काम आहे का? बरं नाही वाटत म्हणून पडले आहेत.'' ती म्हणाली.
''त्यांच्यावर वॉरंट आहे. त्यांना अटक करण्याचं कटु कर्तव्य मला करावयाचं आहे. दुर्दैवी माझे हात.'' तो म्हणाला.
पोलीस व फौजदार आलेली वार्ता गावात तात्काळ गेली, गावातील स्त्री-पुरुष, मुले सर्वांची तेथे गर्दी झाली. आश्रमातून दयाराम, पार्थ, चुडामण तेथे आले. रामदासही उठून बाहेर आला. फौजदार, पोलीस आत येऊन बसले. रामदासने वॉरंट पाहिले. राजद्रोह, खून करणे वगैरे कलमांखाली अटक होती.
''ही काय भानगड?'' रामदासने विचारले.
''आम्हाला तरी काय माहीत !'' फौजदार म्हणाला.
''शेतकर्यांचे रस्ते करणारा, त्यांच्या विहीरी बांधून देणारा, त्यांच्या जमिनी परत देणारा, त्यांच्यासाठी दवाखाने घालणारा, त्याला का अटक? तो अपराधी?'' गावातील म्हातारे चिमाआप्पा म्हणाले.
''सरकारला जमीनदार आवडतात, जमिनी देणारे आवडत नाहीत.''दयाराम म्हणाला.
''बरं चला, निघा.'' फौजदार म्हणाले.
''खरंच का नेणार यांना?'' माया रडत म्हणाली.
''आम्ही हुकमो बंदे.'' फौजदार म्हणाले.
''ही बंगाली बाधा आहे. बंगाली मुलीमुळे सरकारला संशय आला. ब्रिटिश सरकार आम्हाला सुखाचं लग्नही नाही का करू देणार? बंगालच्या पाठीमागं नेहमीच का हात धुऊन लागणार? माझा दुर्दैवी बंगाल.'' ती दुःखाने म्हणाली.
''भाग्यवान बंगाल.'' दयाराम म्हणाला.