क्रांती 97
''यंदा अतिवृष्टीमुळे पिकं गेली. लाखो शेतकरी एकत्र जमून त्यांनी सांगितलं. ते का खोटं? तुम्ही स्वतः डोळयांनी नसेल का पाहिलं? सरकारं समजा परकी. आपण तरी येथलेच आहोत ना? आपल्याच लोकांना का आपण बोलावं? त्यांच्या श्रमानं आपण जगतो, त्यांचा का अपमान करावा? ही कृतघ्नता आहे. काय तुमचं नाव?'' त्याने त्या शेतकर्याला विचारले.
''सोनखेडीचाच मी. माझं नाव गणबा. यंदा कठीण आहे बघा राजांनो दशा. घरी पोरांच्या जिवाला गोड नाही वाटत. बायको घोंगडीवर पडलेली. शेतकर्याचं कुणी नाही जगात.'' तो म्हणाला.
''कशानं आजारी आहेत?'' त्याने विचारले.
''उपासमारीनं. शेतकर्याला दुसरा आजार नाही. ते ग्रामोध्दारवाले येतात, गप्पा मारायला, सरकारी अधिकारी येतात; परंतु शेतकर्यांच्या मुख्य रोगावर कोणी बोलत नाही. शेतकर्याला पोटभर खायला मिळेल तर इतर गोष्टी करण्याकडे त्याचं लक्ष लागेल. रस्ता करा म्हणे. कशाला करा? सावकाराची गाडी जप्तीसाठी यायला, नि पोलीस मोटार घेऊन यायला? आम्ही गावचे लोक खपून रस्ता करू, परंतु आमचा माल आमच्याजवळ राहणार असेल तर तो रस्ता करायला उत्साह राहील. उपासमार हा रोग आधी दूर व्हायला हवा. हवा चांगली मिळाली, उजेड नीट घरात आला, रस्ता चांगला झाला, परंतु पोटात मात्र घास नाही, तर काय उपयोग? शेतकर्याचं प्रेत न्यायला चांगला रस्ता झाला. दुसरं काय?'' गणबा म्हणाला.
इतक्यात फळांच्या करंडया घेऊन स्टेशनवरून माणूस आला.
''द्राक्षं नाही का रे आली?'' मुनिमजींनी विचारले.
''डाळिंबंच आली.'' तो माणूस म्हणाला.
मुनीमजी म्हणाले.
गणबाच्या मुलांना देऊ दोन डाळिंबं, देऊ चार मोसंबी.''
रोज का देता येतील?'' मुनिमजींनी प्रश्न केला
क्रांती झाली म्हणजे सर्वांना रोज मिळेल.'' रामदास म्हणाला.
रामदासने दिली. गणबाने पदरात बांधून घेतली.
काही काळजी करू नको. कोठे आहे त्याचा कागद?'' त्याने विचारले.
मुदतही भरत आली आहे. नवीन प्रॉमिसरी करून घेतली पाहिजे.''
''गणबा, आजपर्यंत किती दिलंस व्याज?'' रामदासाने विचारले.
''माझ्या हिशेबाने दोनशेच्यावर दिले गेले. हे कापूस आमचा आणतात व भाव कमी लावतात. शेंगा आणतात, भाव कमी लावतात. असा चालतो हिशेब. पैसे घेतले त्यापेक्षा अधिक त्यांना मिळाले. परंतु मुद्दल कायम ते कायम.'' गणबा म्हणाला.
रामदासाने त्या प्रॉमिसरीचे टर्रकन तुकडे तुकडे केले व बाहेर फेकले.
''हे काय देवा, आम्ही तुमचे पैसे देऊ. नरकात थोडंच जायचं आहे !'' गणबा रडत म्हणाला.