क्रांती 88
''माया, तुमच्या महोत्सवाचे दिवस ही गोष्ट खरी; परंतु या दुःखीकष्टी लोकांना आज कोणता आनंद? आपण सारीच चार दिवस जाऊ तर येथे कोण काम करील? उघडी अनाथ माणसं सारखी येत असतात. एखादी माता उघडं बाळ घेऊन येईल व म्हणेल, 'द्या याला आंगडे.' परंतु येथे कोणीच नसेल तर? तुमची होईल पूजा; परंतु ती माता पायी चालत आलेली, आशेनं आलेली, ती निराश होईल, तिचा धीर खचेल. माया, या दुःखी बंधु-भगिनींची सेवा म्हणजेच खरी पूजा. नवरात्रात देवीची आपण पूजा करतो. आमच्याकडे अठरा हातांची देवी असते. कोणती ही देवी? अठरा पगड जातींचे लोक हेच ते हात. असे हात असलेली हिंदमाता म्हणजेच आपली देवी. त्या हिंदमातेची पूजा म्हणजेच देवतापूजन. दुष्काळात, महापुरात सापडलेले हिंदु-मुसलमान येथे येतील. त्यांना सहानुभूती व साहाय्य देण्यासाठी येथे राहणं म्हणजेच नवरात्र.'' रामदास म्हणाला.
''मी एकटी घरी जात नाही. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. प्रेमानं कधी कर्तव्याची जाणीव होते, तर प्रेमानंच कधी विस्मृती पडते.'' ती म्हणाली.
''प्रेम वाढवलं म्हणजे असं होत नाही. मोठया प्रेमामुळे मोठं कर्तव्य कोणतं ते कळतं.'' रामदासने सांगितले.
तेथील कचेरीचे मुख्य व्यवस्थापक हेरंबचरण घरी गेले नाहीत. माया घरी गेली नाही. रामदासही तेथे होता. आणखीही काही स्वयंसेवक राहिले.
''माझ्याजवळ शिवायला शिका.'' माया म्हणाली.
''मला येतं शिवायला, शिवून दाखवू?'' रामदासने विचारले.
''दाखवा बरं.'' ती म्हणाली.
''तेथे बाहेर चल.'' तो म्हणाला.
''चला.'' ती म्हणाली. दोघे बाहेर आली.
'''ही घ्या सुई, शिवा.'' ती हसून म्हणाली.
''तू पळ.'' तो म्हणाला.
''का? जवळ असले म्हणजे लाज वाटेल वाटतं? टाका नीट न पडता बोटात गेला तर मी हसणार नाही; बोटातली सुई काढायला येईन.'' ती म्हणाली.
''त्या दिवशी स्वतःच्या पायात बोचलेला काटा काढवेना; मला हाक मारलीस आणि आता दुसर्याच्या बोटातील सुई काढणार होय? बरं, ते जाऊ दे. तू पळ बघू.'' तो म्हणाला.
''खरंच का जाऊ?'' ती म्हणाली.
माया खरेच पळत सुटली. रामदास एकदम हळूच पाठोपाठ पळत गेला. त्याने एकदम मायेच्या पाठीला हात लावला. तिने घाबरून मागे पाहिले तो रामदास.
''काय गेली ना बोटात सुई?'' तिने विचारले.
''पण शिवून दाखवलं नां, काही असो.'' तो म्हणाला.
''इतक्यात झालं शिवून?'' तिने हसून प्रश्न केला.
''हो.'' तो म्हणाला.
''दाखवा बरं.'' ती म्हणाली.
त्याने पुन्हा पाठीला हात लावला.
''दाखवा ना.'' ती म्हणाली.
त्याने तिच्या हाताला स्पर्श केला.