क्रांती 110
शेवटी रामदास, शांता, मोहन सारी सोनखेडीला गेली. मोहन व शांतेचेही आई-बाप आले. शांतेची मैत्रीण गीता आली. मुकुंदराव आले. सोनखेडी व शिवतर येथील बरीच मंडळी आली होती. साधा सुटसुटीत समारंभ. मोहन व शांता सकाळपासून सूत कातीत होती. दोघे व्रतस्थ होती. दोघांचे मौन होते. दोघांनी काही खाल्ले नाही. चरख्याचे संगीत त्यांनी चालविले होते. सायंकाळ झाली. कातलेल्या सुताचे हार तयार झाले. मुकुंदरावांनी विवाहमंत्रांचा मराठी अर्थ सांगितला. नंतर वधूवरांनी परस्परांस सुताचे हार घातले. आई-बापांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. नंतर मुकुंदराव थोडेसे बोलले. ते म्हणाले, ''लग्न हे विघ्न नसून संरक्षण आहे. लग्न म्हणजे आधार आहे. लग्न म्हणजे गलबत वाहून जाऊ नये म्हणून असलेला नांगर. विवाह झाला, गृहस्थाश्रम सुरू झाला. आता लहरीप्रमाणे वागून चालणार नाही. दुसर्यांची काळजी आता सुरू होते. मी नीट न वागेन तर तिचं कसं होईल. त्यांचं कसं होईल, हा विचार आता मनात येतो. पती जेवला नाही तर पत्नी जेवणार नाही. पत्नी रुसली असेल तर पती दुःखी होईल एकमेकांचे अद्वैत निर्माण होते. प्रत्यक्ष दैनंदिन सेवेनं प्रेम पिकत जातें, गोड होत जातं, वेदातील मंत्र म्हणत, 'वधू म्हणजे पृथ्वी तर वर म्हणजे आकाश.' आकाशात वादळे येतात. परंतु पृथ्वी क्षमाशील असते. आकाशातील सारे रंगढंग ती शांतपणे सहन करते. तिला माहीत असतं की, या सार्या चंचल रंगाच्या पाठीमागे एक अभंग निळा-निळा रंग आहे पृथ्वीही कधी-कधी संतापते. भूकंप होतात. आदळआपट होते. परंतु त्या वेळेस आकाश शांत राहील. पृथ्वी व आकाश म्हटलं तर परस्परांपासून दूर. म्हटलं तर क्षितिजाजवळ सदैव चिकटलेली. त्याप्रमाणे पती जरी दूर काम करीत असला व पत्नी दूर असली तरी त्यांची हृदयं चिकटलेलीच आहेत. आत्मा आत्म्याला मिळालेलाच आहे. मोठं काव्य आहे. हे जीवनाचं काव्य, गृहस्थाश्रम म्हणजे महाकाव्य, गृहस्थाश्रम म्हणजे शाळा. या शाळेत मनुष्य संयम शिकतो. समजा, कोणी आजारी पडलं, त्याची शांतपणे शुश्रूषा करावी लागते. मुलंबाळं झाली, त्यांची काळजी घ्यावी लागते. रात्रंदिवस जगावं लागतं. केवढी सहनशीलता व शांती अंगी हवी. दिवसभर काम करावं, घरी यावं तो कोणी आजारी असावं, रात्री जागरणर व्हावं, तरीही आनंद मानावा, शांती धरावी, हे सोपं नाही. मुलानं चिरचिर केली तर त्याला थोबाडणारे आई-बाप असतात. रात्री मूल जरा रडलं तर काटर्याला शिव्या मिळतात. अशानं संसार सुखाचा नाही होणार. संसार म्हणजे कामक्रोधाचे वेग आवरायला शिकणं. हळूहळू शांत होणं गृहस्थाश्रमात सहकार्य-तडजोड पदोपदी असते. गृहस्थाश्रमात पडलेलेच चांगले कार्यकर्ते होतील. ते उगीच डोक्यात राख नाही घालणार. सार्वजनिक जीवनात संयम, मर्यादा, सहकार्य, तडजोडीची वृत्ती यांची अत्यंत जरूरी असते. ''ऊठ व मार घाव' यानं काम होत नाही. पतीला पत्नीची मर्जी सांभाळावी लागते, पत्नीला पतीची. आपलंच तेवढं खरं असा कोणी हट्ट धरला तर चालणार नाही. आज माझ्या आवडीची भाजी, उद्या तुझ्या आवडीची. एकमेकांच्या आनंदात आनंद मानायला शिकायचं. याला त्याग लागतो. निरहंकार व्हावं लागतं. मोलाचे सद्गुण संसाराच्या शाळेत शिकावे लागतात. शांता व मोहन आपला संसार सुखाचा करोत. ते संसार शेजार्यास सुखावह होवो. आपल्याजवळ असेल ते द्यावं, गोड बोलावं, वेळी कामी यावं. जेथे असाल तेथे चंदनाप्रमाणे झिजा व आसपासचा भाग सुगंधी करा. भांडणतंडण नको. आरडाओरडा नको. पेटीच्या निरनिराळया सुरांतून कुशलतेनं संगीत काढता येतं, त्याचप्रमाणे आपल्या निरनिराळया वृत्तींतून कमीअधिक दाबानं सुंदर संगीत निर्माण करा. प्रभू तुम्हाला आनंदात ठेवो, सन्मार्गावर ठेवो, तुमची जीवनं कृतकृत् करो.''
सर्वांना फुले देण्यात आली व गूळ देण्यात आला. मोहनचा व शांतेचा संसार सुगंधी होईल, मधुर होईल, असे सर्व म्हणाले. शांता व मोहन यांनी भोजन केले. पारणे झाल, रात्री प्रार्थनेनंतर रामदासाने दिलरुबा वाजविला. विवाह म्हणजे दिव्य संगीत, स्वर्गीय एकतानता, दिलाला दिल मिळविणे, असा जणू संदेश त्या संगीतातून मिळत होता.
शांता व मोहन धनगावला आली. पति-पत्नी म्हणून राहू लागली. आंतरिक लग्न कधीच लागले होते. आता बाह्य औपचारिक लग्न लागले. शांतेने मोहनची ती लहानशी खोली सजविली. सारे झाडून स्वच्छ केले. स्त्री म्हणजे स्वच्छता, व्यवस्था. स्त्री म्हणजे सौन्दर्य, कुशलता. भांडे पुरुषाने घासले आहे की स्त्रीने हे ताबडतोब समजून येते. अंथरूण पुरुषाने घातले आहे की स्त्रीने हे लगेच कळून येते. स्त्रियांना ती कामे क्षुद्र नाही वाटत. त्या, त्या लहान कामातही आत्मा ओततात व ते लहानसे कर्म कमळाप्रमाणे फुलवून ठेवतात.
मोहनचे पुष्कळसे काम आता शांता करी. युनियनचे हिशेब ती ठेवी. पत्रव्यवहार करी. वर्तमानपत्रांतील महत्वाच्या वार्ता शांत युनियनच्या वार्ताफलकावर लिहून ठेवी. इतक्या सुंदर अक्षराने आजपर्यंत वार्ताफलक कोणीही लिहिला नव्हता. आता त्या वार्ताफलकाकडे पाहावे असे सर्वांस वाटे. दुपारच्या वेळी ती कामगारांच्या चाळीत जाई. त्यांच्या मंडळींत मिसळे. त्यांचा आजार वगैरे विचारी. त्यांना शिकवी, माहिती देई. तिने शिवणकामाचा वर्ग उघडला. युनियनच्या शिलकेतून एक मशीन आणण्यात आले. त्यावर बायका-मुली शिवू लागल्या. फावल्या वेळात आपापले कपडे शिवू लागल्या. शांतेने कामगारांच्या चाळीत चैतन्य नेले. एके दिवशी दुपारी शांता फिनेल घेऊन आली. म्युनिसिपालिटीकडे येथे आणखी एक पिपडे ठेवावे असा युनियनमार्फत अर्ज केला गेला. कामगार कामावरून आले तो त्यांना सर्वत्र प्रसन्न वातावरण दिसले.