क्रांती 79
मोहन उभा राहिला. त्याच्या क्षीण दृष्टीत चमक आली. सारी शक्ती कंठात आली. त्यानं गाणं म्हटलं.
कोण करिल दूर
कोण करिल दूर
ही पिळवणूक आमुची, कोण करिल दूर ॥धृ.॥
श्रमाने ज्याच्या, शेती हो पिकली
पोरेबाळे त्याची, उपाशी झोपली
सावकाराने त्याची, अब्रू हो विकली
भांडवलशाही बघा, फार आहे क्रूर ॥ही.॥
विणी जो कपडा, कोटयवधी वार
थंडीत उघडा, पडे तो कामगार
पोरेबाळे त्याची, झाली हो थंडगार
गिरणीतून निघतो, सोन्याचा धूर ॥ही.॥
किसान कामगार, उठू दे वारा
क्रांतीचा आता सुटू दे वारा
स्फूर्तीचा आता, चढू दे पारा
पडून नका राहू, व्हा आता शूर ॥ही.॥
किसान आता मांडू दे ठाण
करू दे वरती, मजूर मान
ओठावर नाची क्रांतीचे गान
सर्वत्र घुमू दे क्रांतीचा सूर ॥ही.॥
तुम्हाला सांगतो, भविष्य-वाचा
भविष्य उज्ज्वल, श्रमेल त्याचा
झेंडे हाती घेऊन निघा नि नाचा
झोपडीत येईल, सुखाचा पूर ॥ ही.॥
'इन्किलाब झिंदाबाद' अशी गाणे संपताच प्रचंड गर्जना झाली. कामगारांनी स्वातंत्र्याच्या दिवशी सुटी न मिळाली तर हरताळ पाडण्याचे जाहीर केले. त्याच सभेत विद्यार्थ्यांनीही तीच घोषणा केली. गावोगांव लहान मुले प्रचार करू लागली. एका मराठी शाळेतील पाचवी-सहावीतील हिंदू-मुसलमान मुले रोज सायंकाळ झाली म्हणजे आसपासच्या खेडयांतून जात व स्वातंत्र्याच्या दिवशी घरी बसू नका असे सांगत. एके ठिकाणी प्रांतसाहेबांचा मुक्काम होता. वानरसेना तेथे गेली. खेडयापाडयांतील शेतकरी तेथे जमले होते. ''पिकलं नसेल तर तहशील भरू नका, अधिकार्यांना भिऊ का. ते आपले नोकर आहेत. आपण त्यांना पगार देतो. त्यांची भीती धरू नका.'' असे मंत्र म्हणत वानरसेना तंबूवरून गेली. प्रांतसाहेब 'आ' पसरून उभे राहिले.