क्रांती 67
शांता निघून घरी आली. आपल्या खाटेवर बसली. रडली. पोटभर रडली. बाहेर एकाएकी प्रचंड वादळ सुरू झाले. धों धों वारा वाहत होता. आकाशात अकस्मात ढगांवर ढग आले. एका क्षणापूर्वी तेथे अनंत तारे चमचम करीत होते. आता एकही दिसेना. प्रसन्न आकाश शतधारांनी रडू लागले. पोटात साठवलेले दुःख असह्य होऊन बाहेर पडू लागले.
रात्रीचे बारा वाजले असतील, अशा वेळेसच वेणू वाजवणारा श्रीकृष्ण जन्माला आला असुर संहारणारा गोपाळकृष्ण जन्माला आला. शांता शांतपणे उठली, बाहेर पावसात उभी राहिली. हात जोडून उभी राहिली. सृष्टिमाता मुलील पवित्र स्नान घालीत होती. पाण्याचे खळखळ प्रवाह वाहू लागले. पत्र्यावर ताड ताड पाणी वाजत होते. शांता न्हात होती. आकाशात वाद्ये सुरू झाली. बिजलीच्या चंद्रज्योती लावल्या जाऊ लागल्या. शांतेचे न्हाण चाललेले होते. ते का विवाहातील रास-न्हाण होते?
शांतेच्या डोक्यावरून पाण्याची मोती घळघळत होती. तिच्या हृदयसमुद्रातील मोत्यांचे शिंपले उघडले व डोळयांतून मोती घळघळत होती. वरून देवाच्या मोत्यांची वृष्टी. आतून हृदयदेवाची भौतिकवृष्टी.
'शांता, जा ना बाळ आता खोलीत. कोरडे नेस. गारठशील. जा हो. हे बघ बाहेरचे वादळ शांत होत आहे. तूही शांत हो. तुझ्या हृदयकाशातील ढग जाऊ देत. तेथे प्रसन्नता, पवित्रता, फुलू देत.' शांता आत गेली. ती ओलेती होती. तिने आपल्या ट्रंकेतून उबदार खादी काढली. पुन्हा तिने खादी परिधान केली. जणू नवविद्युत्संचार झाला. शांतेने केस पुसले. ती देवपूजेला बसली. मध्यरात्री शांता देवाला ओवाळू लागली-आळवू लागली.
शांतेने ती तसबीर काढली. ट्रंकेतील एक सुताचा हार त्या तसबिरीला तिने घातला. नवीन तलम वस्त्रे सारी तेथे आणून तिने त्यांना काडी लावली. देवाला जणू निरांजन ओवाळले. त्या तलम वस्त्राचे आता भस्म झाले. शांता शुध्द झाली. त्या तसबिरीसमोर तिने मस्तक ठेवले. हात जोडून त्या तसबिरीकडे ती पाहत राहिली. पाहता पाहता तिचे नेत्र मिटले. तसबिरीतील मूर्ती हृदयमंदिरात अनंतरंगात नटलेली ती पाहू लागली.
मोहन तिकडे कृश व जर्जर झालेल्या शांतेच्या फोटोला हृदयाशी धरून अमृतरस मिळवीत होता. शांताही त्या तसबिरीला हृदयाशी धरून अपूर्व शांती अनुभवीत होती.
शांता झोपली. सकाळी लवकर उठली नाही. तिच्याने उठवेना. खरोखरच तिला ताप भरला. ती त्या तापात शांतपणे पडून राहिली.
''काय शांते,कसं काय?'' मित्राने येऊन विचारले.
''ताप आहे. डॉक्टर म्हणतात देवीचा असावा.'' ती म्हणाली.
''देवीचा?'' त्याने आश्चर्याने म्हटले.
''हो. तुम्ही जवळ येऊ नका. आठ दिवसांनी या. देवीचा रोग स्पर्शजन्य.'' ती म्हणाली.
''बरं. तू बरी झालीस म्हणजे येईन. दोन-तीन दिवस तुला ताप येतच होता, तुझा हात कढत असे.'' तो म्हणाला.
''परंतु त्या स्पर्शाची भीती नको. देवी तेव्हा उगवल्या नव्हत्या. आता मात्र उगवतील.'' ती म्हणाली.
''कोणाला घरून बोलव ना.'' त्याने सांगितले.
''बोलावलं आहे.'' ती म्हणाली.
''अच्छा. जातो हां शांता.'' असे म्हणून तो गेला.