क्रांती 130
''पंढरपूरला अनाथ अर्भकालयात जा म्हणजे हिंदूंचाही त्या बाबतीत पराक्रम दिसेल. मित्रांनो, एखादी सारी जातच का वाईट असते? वाईट लोकांना वाईट म्हणा. सर्वांना वाईट नका म्हणू. मुसलमानातही भले लोक आहेत. त्यांना माणुसकी आहे. महायुध्दात पकडलेले शत्रूचे लोक जास्तीत जास्त कोणी चांगले वागवले असतील तर ते तुर्कस्थानने, असा युरोपने शेरा दिला. खेडयापाडयांतून किती प्रेमळ संबंध आहेत. मुसलमान माय-बहिणी जात्यावर गंगायमुनांची गाणी म्हणतात. मक्कामदीनाची नाही. काही बेकार गुंड व नोकर्यांसाठी हपापलेले भांडणं उत्पन्न करतात. हिंदु-मुसलमनांचीच भांडणं आहेत असं नाही; ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचीही आहेत. सारी नोकर्यांसाठी, गुलामगिरीमुळे दुसरे पुरुषार्थ बंद. एकदा स्वराज्य आलं म्हणजे अनंत कार्यक्षेत्रं मोकळी होतील. भांडणं आपोआप बंद होतील. त्या स्वराज्यावर दृष्टी खिळवू या. अर्जुन म्हणाला,'' पक्ष्याची मान व बाणाचं टोक, याशिवाय दुसरं मला काही दिसत नाही.'' तसं आपलं झालं पाहिजे. आपल्या सर्व चळवळींचा रोख परकीय सत्ता आधी नष्ट करण्याकडे पाहिजे. हिंदु-मुसलमानांत पोटभर भांडावयाचं असलं तरीही ते स्वातंत्र्य आज नाही. तुम्हाला थोडं भांडू देण्यात येतं व शेवटी साम्राज्यशाहीचं लष्कर दोघांना मारण्यासाठी येतं. भांडण्यासाठी का होईना आधी स्वतंत्र होऊ या. भांडणं मिटतील. आज अंधारात भांडत आहोत. स्वातंत्र्याचा दीप आला म्हणजे आनंद येईल आणि गडयांनो, धार्मिक पायावर संघटना नाही होत. हिंदू व मुसलमान जमीनदार एक होतात. हिंदू व मुसलमान खोत एक होतात. ज्याचा समान अर्थ-धर्म ते शेवटी एक होतात. चीन व जपानचा धर्म एक. परंतु आर्थिक धर्म एक नाही. म्हणून चाललं आहे हत्याकांड, गरिबांची बाजू घ्या; मग ते गरीब कोणीही असोत. भगवद्गीतेने स्वजन व परजन असा भेद नाही सांगितला. तिने सुजन व दुर्जन असा भेद सांगितला, सारे सुजन एक होऊ या; मग त्यात हिंदूही येतील, मुसलमानही येतील, दीनबंधू ऍण्ड्रयूजही येतील. अशी शास्त्रपूत दृष्टी घ्या. भारतमातेचा मोठेपणा ओळखा. परकी सत्ता आपणात भेद पाडते. आपणही जर तसेच करू या आपणही स्वदेशास परके झाल्यासारखे झालो. हिंदुस्थानातील काही अंतराष्ट्रीय मुसलमान पुढार्यांस इजिप्त, पॅलेस्टाईन वगैरे देशांतील पुढारी हसतात. हिंदुस्थानातील मुसलमानही पुढारी झाले आहेत. साम्यवादी मुसलमान काळया पाण्यावर पाठविले जात आहेत. अहरार पक्ष केवळ राष्ट्रीय आहे. सरहद्द प्रांतात राष्ट्रीयता उसळत आहे. मागील सत्याग्रहात एका सरहद्द प्रांतातून पंचवीस हजारांवर सत्याग्रही तुरुंगात गेले. आपल्याकडे झाला नाही इतका त्यांच्यावर अत्याचार झाला. त्यांच्यातही ठिणगी पडली आहे. मुसलमान आता येथले झाले. आपण शेकडो वर्षं भांडून प्रेमळ संबंध निर्माण करीत होतो. भारताचे महान ध्येय गाठू पाहात होतो; परंतु दूरची परसत्ता आली. पुन्हा ध्येय दूर गेलं; ते ध्येय गाठण्यासाठी फिरून उभं राहू या. सारे मुसलमान वाईट असतील तर आपणच वाईट आहोत हा त्याचा अर्थ आपणातूनच ते पुष्कळसे त्या धर्मात गेले. कोकणात गोडबोले, तांबे आडनावे आहेत; त्यांच्या इतिहासातील मांगल्य घेऊन पुढे जाऊ या. हैदरअली हिंदूंचा दसरा साजरा करी. गायकवाड मुसलमानांचे डोले बसवीत. असा हा महाभारतीय प्रयोग आहे. हिंदूंच्या देवांना टिपूचे नवस व मुसलमानी संतांना हिंदूंचे नवस, असा हा प्रयोग आहे. तो पूर्वजांचा प्रयोग श्रध्देनं पुढे नेऊ या. काही मुसलमान वाईट म्हणून का आपण व्हायचं? दुसरा मुलगा अभ्यास करीत नसला तर बाप का स्वतःच्या मुलाला म्हणतो की, तूही करू नको; दुसरा वाईट असेल तर तू चांगला राहा. तूही वाईट झालास तर दोन वाईट होतील. तो पशू व तूही पशू. पशुपती कोणी व्हावयाचं; पशुत्वातून मनुष्यत्वाकडे जावयाचं. तुम्ही तर पुन्हा पशूत्व करू पाहता. नका, असं करू नका. मी काय सांगू? मी क्षुद्र आहे. या लहानशा हृदयाची होळी होते रे गडयांनो.''
मुकुंदराव थांबले. त्यांच्याने बोलवेना. ''आम्हाला असं कोणी सांगत नाही. वर्तमानपत्रातील मुसलमानांच्या अत्याचारांची कात्रणं तेवढी आमच्या बौध्दिक वर्गात वाचण्यात येतात.'' एकजण म्हणाला.
''तुम्ही असं आंधळे होऊ नका. बुध्दीचा डोळा बंद करू नका. माझी बुध्दी सूर्याप्रमाणे स्वच्छ व निर्मळ राहो, ही तर आपली प्रार्थना. हा तर पवित्र गायत्री मंत्र. बुध्दीच मारली तर वेदधर्म कोठे राहिला? वेदधर्म म्हणजे विचारधर्म. व्यापक विचारांवर उभारलेला धर्मविचार सारखा वाढत आहे. माझा धर्मही नवीन विचार घेऊन वाढेल. मोठे व्हा. जगातील जास्तीत जास्त प्रगत असा विचार हृदयाशी बाळगा.'' मुकुंदराव म्हणाले.