क्रांती 92
''ही काही तरी बतावणी आहे. तुम्ही माझ्या दाराजवळ आला होतात परंतु परत गेलात. तुम्ही आत याल असं वाटून मी खोटं झोपेचं सोंगही घेतलं. परंतु पावलं माघारी गेली. तुमच्या अहंकारानं तुम्हाला येऊ दिलं नाही. परंतु लक्षात ठेवा, निरहंकारी झाल्याशिवाय माया जिंकता येणार नाही.'' ती म्हणाली.
''माया, मी तुझ्या दारापर्यंत आलो एवढा तरी निरंहकारीपणा शिकलो ना? त्या दिवशी तू जे शब्द बोललीस ते ऐकल्यावर कोण तुझ्या दारापर्यंत तरी आला असता? कुत्र्याचा अघळपणा मी करतो का? झाकून टाकू दे मला तो. बरं केलंस. मला सावध केलंस ते. रामदास अतःपर कुत्रा होणार नाही. धीरगंभीर मृगेंद्र होण्याची खटपट करील.'' रामदास म्हणाला.
''जगातील प्रेम शेवटी काचेचं भांडं. त्याला जरी मारलेली टिकचीही सहन होत नाही. फार अलगद उचलावे लागतात हे प्रीतीच्या रसाचे पेले. श्वासोच्छ्वासानंही त्याची छकलं होतील, फुंकराने फुटतील.'' माया म्हणाली.
''स्वाभिमान म्हणून काही आहे की नाही?'' रामदासाने विचारले.
''तो असता तर तुमच्या दारात मी आले असते का?'' माया म्हणाली.
''चित्रे परत करायला आलीस.'' तो म्हणाला.
''हृदयात कायम करण्यासाठी आले.'' ती म्हणाली.
''माया !'' त्याने उत्कटतेने हाक मारली.
''काय?'' तिने हळुवारपणे विचारले.
''आपण एकमेकांस पाहिलं आणि एकदम बोलू लागलो, कधी लाजलो नाही, शरमलो नाही. जणू नवीन असं काही नव्हतंच. जणू शतजन्मांची आपली ओळख होती. खरं की नाही?'' तो भावनाभराने बोलला.
''एकमेकांस पाहिलं आणि जणू आधीच हृदयात असलेले सूक्ष्म फोटो एकदम विकसित झाले. पूर्वीच्याच बीजाला जणू एकदम अंकुर फुटले.'' माया म्हणाली.
''हा घे तिळगूळ. झालं ना गोड?'' त्याने विचारले.
''माझ्या हृदयाची तार तोडलीत, म्हणून तुमच्या दिलरुब्याचीही तार तुटली.'' ती म्हणाली.
''माझ्या जीवनातील तू संगीत.'' तो म्हणाला.
''माझ्या जीवनातील तुम्ही कला-मूर्ती.'' ती म्हणाली.
''संयमाशिवाय संगीत नाही. फुंकणीतून सूर निघत नाही. परंतु संयमी बासरीतून निघतात.'' रामदास म्हणाला.
''प्रमाणाशिवाय कला नाही.'' माया म्हणाली.
''माया, बांध ग ही तार, हलक्या हातानं परंतु घट्ट बांधायला हवी.'' तो म्हणाला.