क्रांती 149
''आपण कोठले?'' त्यांनी प्रश्न केला.
''पुष्कळ वर्षांनी मी आपणास भेटत आहे. आपण एका शाळेत होतो. वादविवादोत्तेजक सभेत मी बोलत असे. माझं नाव अक्षयकुमार. शाळेत ते एक विक्षिप्त व्यायामशिक्षक होते. आठवतं का?'' अक्षयकुमारांनी विचारले.
''आठवलं, सारे आठवलं. त्या व्यायामशिक्षकांस आपण रस्त्यात नमस्कार करीत नसू म्हणून ते एके दिवशी रागावले; तर सर्व मुलांनी रस्त्यात, या गल्लीतून त्या गल्लीतून पुढे येऊन 'मास्तर नमस्कार, मास्तर नमस्कार' असं सारखं करून त्यांना कसं भंडावलं? मज्जा ! आणि ते बोर्डिंग ! मुलांना तेथे चण्याच्या डाळीचंच रोज वरण मिळायचे. म्हणून ती एक दिवस व्यवस्थापक येताच घोडयासारखी खिंकाळू कशी लागली व काय प्रकार आहे म्हणून त्यानं विचारताच हरभरे खाऊन घोडे झालो असं उत्तर दिलं गेलं. गंमतच गंमत. अक्षयबाबू, किती दिवसांनी आपण भेटत आहोत ! त्या लहानपणच्या जगात जात आहोत ! नाही तर हे रोजचं माझं जिणं, यमदूताचं जिणं.'' ते म्हणाले.
''आनंदमोहन, हे माझे मित्र रमेशबाबू. आम्ही एकाच गावी राहतो. यांना एकच मुलगी व मला एकच मुलगा.'' ते म्हणाले.
''मग दोघंचं लग्न लावलंत की काय?'' ते हसून म्हणाले.
''आमची तशी होती इच्छा.'' रमेशबाबूंनी सांगितले.
''परंतु मुलांनी ऐकलं नाही, होय ना? अलीकडची मुलं फारच व्रात्य. मी माझ्या मुलांना कडक शिस्तीत ठेवलं आहे. हूं की चूं करणार नाहीत. लहानपणापासून जरब असली म्हणजे सारं नीट सुरळीत चालतं.''आनंदमोहन म्हणाले.
''एकुलती एक मुलगी. लाड पुरवीत होतो. शान्तिनिकेतनात ठेवली शिकायला.'' रमेशबाबू सांगू लागले.
''झालं मग. शांतिनिकेतनात पूर्ण स्वातंत्र्य. म्हणे सृष्टीच्या पवित्र सान्निध्यात मुले शिकतात. काही तरी मोठया लोकांची खुळं. पूर्वी का कोणी शिकले नाहीत? नवीन खूळ काढायचं व त्याला अगडबंब 'क्रान्ती' नाव द्यावयाचं, '' आनंदमोहनांचे व्याख्यान सुरू झाले.
''तेथे एक महाराष्ट्रीय तरुण होता. त्याच्यावर तिचं प्रेम बसलं. शेवटी निरुपाय म्हणून त्याच्याशी दिलं लग्न लावून.'' रमेशबाबू दुःखाने म्हणाले.
''तोच हा तरुण की काय? रामदास का त्याचं नाव?'' साहेबांनी विचारले.
''हो त्याला पकडण्यात आलं आहे. म्हणून तुमच्याकडे आलो आहे. काही करा. परंतु मुलीच सौभाग्य वाचवा. म्हातारपणी नाही नाही ते नको पाहायला.'' रमेशबाबू हात जोडून म्हणाले.
आनंदमोहन गंभीर झाले. ते स्तब्ध बसले.
''आरोप तरी काय आहे त्याच्यावर?'' अक्षयबाबूंनी प्रश्न केला.