क्रांती 16
3. मुकुंदराव
रामदास इंग्रजी सातवीत होता. शांता सहावीत होती. दोघे पूर्वीप्रमाणेच साधेपणे राहत. रामदास अंगावर खादी घाली. शांताही खादी वापरी. त्यांनी आपापल्या वर्गात खादीचे वेड वाढविले. शांता मोठी धीट होती. मुलांना ती प्रश्न करून भंडावून सोडायची.
''मला एवढी साडी जड होत नाही. तुम्हाला पायजमे का जड व्हावेत? खादी न घ्याल तर दयारामाचा आश्रम कसा चालेल? गरिबांना घास कसा मिळेल?'' ती विचारी.
परंतु एक नवीन घटना झाली. त्या शाळेतून दरवर्षी काही जुने शिक्षक जात आणि काही नवीन येत. यंदाही एक नवीन शिक्षक आले होते. तेजस्वी होती ती मूर्ती. कर्तव्यकठोर असूनही कारुण्यमयी होती. त्या मूर्तीने मुलांना वेड लावले. त्यांचा तास केव्हा येतो, मुले वाट बघत. ते गौरवर्णाचे होते. त्यांना गौरवर्णावर पुन्हा शुभ्र खादी. आधीच सोन्याचे, त्यात जडावाचे. वयाने जरा ते पोक्त दिसत.
वर्गात शेकडो प्रश्नांची ते चर्चा करीत. आजकालच्या सर्व प्रश्नांची मुलांना परिचय करून देणे म्हणजेच शिक्षण, असे ते म्हणत. मुलेही त्यांना निःशंकपणे शंका विचारीत.
एके दिवशी शांतेने प्रश्न केला, ''अहिंसेनं का क्रांती होईल?''
ते म्हणाले, ''क्रांतीचा व हिंसा-अहिंसेचा काय संबंध? क्रांती म्हणजे काय? क्रांती म्हणजे बदल. परंतु नुसता बदल नव्हे. परके राज्य जाऊन तेथे आपले राज्य झालं, एवढयानं क्रांती होत नाही. क्रांती म्हणजे मूल्यपरिवर्तन. आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व चढलं आहे. वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे, त्यांना कोणीच देत नाही. मुख्य महत्त्व माणुसकीलाच आहे. परंतु आज माणुसकीला समाजात मूल्य नाही. आपण आज बांडगुळाची पूजा करीत आहोत. ज्यांच्या श्रमांवर सारी दुनिया जगते, तो आज मरत आहे. त्याला ना मान, ना स्थान. व्यापार्याला मान आहे. सावकाराला मान आहे. कारखानदाराला मान आहे, परंतु त्याच्या हाती द्रव्य देणार्या किसानास-कामगारास-मान नाही. घरात रात्रंदिवस काबाडकष्ट करणार्या स्त्रीला मान नाही. कोणत्याही सभेत, कोणत्याही दिवाणखान्यात शेणगोळे लोडाशी बसतात आणि श्रमाने धनधान्य निर्माण करणारे दूर बसतात. हे बदललं पाहिजे. श्रम न करणार्याला तुच्छ मानलं पाहिजे. श्रम करणार्याला उच्च मानलं पाहिजे. याला मूल्यपरिवर्तन म्हणतात. अन्यायाला सिंहासनावरून ओढून तेथे न्यायाची प्रतिष्ठापना करणं म्हणजे, 'क्रांती.'
''प्रतिष्ठा पैशाची नाही, पोपटपंचीची नाही, धोक्या विद्येची नाही. प्रतिष्ठा कुळाची नको, प्रतिष्ठा बाह्य बळाची नको. मी म्हणे चंद्रवंशातला, सूर्यवंशातला. मी म्हणे आर्य. मी म्हणे कपिंगोत्रोत्पन्न. बाकीचे का मातीतून जन्मले आणि तू सोन्याचा जन्मलास? तुझी स्वतःची काय किंमत ते सांग. कोणाचा कोण, ते नको सांगू. तुझ्या नसांतून कोणाचंही रक्त वाहात असलं तरी त्याचा रंग लालच असणार. तुझ्या रक्ताचा रंग तुझ्या कृतीतून प्रकट होऊ दे. तुझी किंमत तुझ्या कृतीवरून ठरू दे. याला म्हणतात, 'क्रांती'.