क्रांती 61
गावात त्या दिवशी काही पारशी स्त्री-पुरुष मंडळी सुखसंचाराला आली होती. रहदारी बंगल्यात उतरली होती. सायंकाळी सुंदर पोषाख करून ती सारी मंडळी टेकडीवर फिरायला आली होती. एके ठिकाणी बसली होती. परंतु त्यांच्यातील एक तरुणी एकटीच न बसता हिंडता होती. टेकडीवरची सुंदर रंगाचे खडे ती गोळा करीत होती. ईश्वराने तेथे मुक्त हस्ताने विखुरलेली ती माणिकमोती गोळा करीत होती. सूर्य मावळला होता. त्याचे सुंदर रंग पसरत होते. मावळला सूर्य. मोटार निघून गेल्यावर धुळीचे लोट सुटतात. सूर्य निघून गेल्यावर सौंदर्याचा समुद्र पसरतो. ती पारशी युवती त्या सुंदर रंगाकडे बघत राहिली.
''किती सुंदर सुंदर संध्या ! वाटतं उडून जावं व तिचं चुंबन घ्यावं, तिचं सौंदर्य प्यावं.'' ती म्हणाली.
श्रीनिवासरावांचे लक्ष एकदम त्या पारशी युवतीकडे गेले. 'मिनी, माझी मिनी,' असे म्हणत ते पळत सुटले. खडा लागला. खरोखर मिनी आली.
''मिने, मिने थांब, तशीच तेथे थांब. किती मोठी झालीस तू !'' अशी हाक मारू लागले. ती युवती चपापली व घाबरली. ती पळू लागली. तिच्या पाठोपाठ वेडा पिता पळू लागला. ''मिने, पळू नको. मी म्हातारा दमेन. थकेन, नको जाऊ हरिणीसारख्या उडया मारीत. मिने, शपथ आहे तुला.'' पिता पळत ओरडत होता. ओरडत पळत होता.
ती भेदरलेली युवती घाबरलेली, बावरलेली अशी आपल्या मंडळींजवळ आली.
''काय गं झालं; वाघ का दिसला, साप का होता?'' विचारू लागली सारी. तिच्याने बोलवेना. छाती धडधडत होती. तोंड गोरेमोरे झाले होते. घाम सुटला होता. तिच्या आईने तिला घट्ट धरले. ''काय झालं बेटा?'' प्रेमाने तिला विचारले.
''भूत, भयंकर भूत.'' ती म्हणाली.
''कोठे आहे?'' सर्वांनी विचारले.
''ते बघा आले. आले.'' ती पुन्हा घाबरली.
पुरुष मंडळी पुढे गेली. श्रीनिवासराव पळत येत होते.
''मीना, तिकडे गेली ना हो?'' त्यांनी धापा टाकीत विचारले.
''मीना कोण? इकडे कोणी नाही.'' त्यांनी उत्तर दिले.
''अहो, माझी मीना किती वर्षांनी आली. नका तिला लपवू. नका पित्याची व तिची ताटातूट करू. रोज मी वाट बघतो येथे येऊन. आज खडा लागला. म्हटलं आली. ती समोर दिसली. किती गोड दिसली. सूर्याच्या रंगाकडे बघत होती ती. इकडे पळत आली. तुम्हाला नाही दिसली?''
''अहो, ती आमची मुलगी.'' पारशी मुलीचा पिता म्हणाला.
''अहो माझी, माझी ती मीना.'' श्रीनिवासराव म्हणाले.
''चला, तुम्ही पाहा.'' ते म्हणाले.
सारे परत आले. त्यांच्याबरोबर श्रीनिवासराव होतं. त्या पारशी मुलीला तिची माता धरून बसली होती.
''ही पाहा आमची मुलगी. ही तेथे टेकडीवर उभी होती.'' तिचा पिता म्हणाला.
''ही नव्हे माझी मीना. मिनी हिच्याहून सुंदर आहे. दुरून मला मिनीच वाटली. दुरून सारं सुंदर दिसतं. मिनीनं फसवलंन् एकूण. खडा लागूनही नाही आली. येईल, उद्या येईल. ती एक दिवस येईल. वृध्द पित्याला एक दिवस भेटून जाईल.'' असे म्हणत श्रीनिवासराव गेले.