क्रांती 108
''माझ्यापेक्षा माझा फोटोच तुला आवडतो?'' शांता म्हणाली.
''या जन्मी तुझ्या फोटोवरच समाधान.'' तो म्हणाला.
''का बरं?'' तिने विचारले.
''मी काय सांगू?'' तो खिन्नतने म्हणाला.
''मोहन, तुझी पत्नी होण्यासाठी मी आले आहे. रात्रंदिवस तुझ्या उशाशी बसेन. मात्र कंटाळू नको मला.'' ती म्हणाली.
''माझी पत्नी? माझ्याशी लग्न?'' त्याने विचारले.
''हो.'' ती म्हणाली.
''शांता, मरणाशी लग्न नको लावूस. पुढच्या जन्मी आपण पतिपत्नी होऊ. या जन्मी दुरून मजकडे पाहा. तू माझ्याशी लग्न लावलंस तर मी वाचणार नाही.'' तो म्हणाला.
''मी विद्या शिकून आले आहे. संजीवनी मंत्र शिकून आले आहे. मोहन, मी मरणार नाही आणि तुलाही मरून देणार नाही.'' ती म्हणाली. दोघे शांत होती. शांता मोहनच्या केसांवरून हात फिरवत होती. किती प्रेमोत्कट व भावपूर्ण दिसत होती ते दोघे जण !
''मोहन, मी तुला तपासते. तपासू?'' तिने विचारले.
''तपास. माझं हृदय शाबूत आहे की नाही पाहा. मोहनचं खरं प्रेम आहे की वरवरचं आहे तेही तपास. सारं पाहा.'' तो म्हणाला. शांतेने आपले सामान आत आणले. तिने आपली ट्रंक उघडली. त्यातून लांब नळी तिने काढली. मोहनच्या छातीचे ती ठोके मोजू लागली.
''मोहन, खोक बरं जरा.'' ती म्हणाली. मोहन खोकला. हातात नंतर नाडी घेऊन ती बसली. नाडी पाहून झाली.
''खरंच पाठीवर वळ बरं. पाठ तपासायची राहिलीच.'' ती म्हणाली.
मोहन उपडा वळला. पाठ तपासण्यात आली. बोटान तिने ठोकून पाहिले. नंतर थर्मामीटरने ताप आहे का पाहण्यात आले. तिने मोहनची जीभ पाहिली, डोळे पाहिले.
''जगेल का रोगी?'' मोहनने हसून विचारले.
''एवढा मोठा डॉक्टर आता औषध देणार आहे, मग का जगणार नाही रोगी?'' शांता म्हणाली.
''तुमची सारी कसरत करून दाखविण्यातच रोग्याचा अर्धा जीव जावयाचा.'' मोहन म्हणाला.
इतक्यात दारात रामदास येऊन उभा.
''काय शांते, रोगी तपासतेस वाटतं?'' तो म्हणाला.
''भाऊ, त्यांना रोगी नाही म्हणावयाचं बरं का. रोगी-रोगी म्हणून तर रोगी व्हायचे. यांना रोग वगैरे काही नाही. जरा नीट वागतील तर सारं छान होईल. वागाल ना हो?'' शांतेने विचारले.
''मला अहो जाहो म्हणशील तर काय रोग बरा होणार?'' त्याने म्हटले.
''मोहन, ती आता तुझी पत्नी होणार आहे. नवर्याचा मान अधिक असतो.'' रामदास म्हणाला.
''चुकून आलं हो तोंडात. अहो, मी मोहनच म्हणेन. माझा मोहन, मोहन. आता नीट वागशील ना? देईन औषध ते घेशील ना?'' शांतेने विचारले.
''शांता, एकदा चांगल्या डॉक्टराकडून यांना तपासून घ्यावं असं मला वाटतं.'' रामदास म्हणाला.
''भाऊ, यांचं लग्न झालं ना म्हणजे बघ कसे एकदम सुधारतील ते. तेच एक यांना औषध.'' ती म्हणाली.