क्रांती 112
''नदी जर एके ठिकाणी थांबली तर तिचं डबकं होईल. नदी खळखळ वाहत राहील, सारखी गतिमान राहील, इथून तिथे, तिथून पलीकडे जात राहील तरच तिचं जीवन स्वच्छ राहील, तिची वाढ होईल. आसपासच्या लोकांच्या ती उपयोगाला येईल व एक दिवस सागराच्या चरणी पडून कृतार्थ होईल. माझं जीवन वृक्षाप्रमाणे नसून नदीसारखं आहे.'' तो तरुण म्हणाला.
''कोठे राहता तुम्ही?'' शांतेने विचारले.
''एका बाजूला एक घेतली आहे खोली. स्वतंत्र आहे.'' तो म्हणाला.
''तुम्हाला आणखी कोणी नाही? तुम्ही का एकटे आहात?'' शांतेने पुन्हा प्रश्न केला.
''सध्या एकटाच फिरत असतो.'' तो म्हणाला.
''येथे किती दिवस राहाल?'' मोहनने विचारले.
''कदाचित मरेपर्यंत राहीन. येथे जर आनंद मिळाला तर येथे राहीन. जेथे मला आनंद वाटत नाही ते मी चटकन सोडून जातो. मी आनंदाचा संशोधक आहे. आनंदाचा उपासक आहे.'' तो तरुण गोड हसून म्हणाला.
''येथे आनंद मिळेल? शक्यता आहे का?'' शांतेने विचारले.
''आनंदाचा वास येतो आहे, कोठून तरी सुगंध येत आहे असं वाटत आहे. हा भ्रम आहे की सत्यता आहे, मोह आहे की माया आहे, लौकरच कळेल. एवढं बारीक खरं की, या भागात आल्यापासून एक प्रकारची अपार प्रसन्नता मनाला वाटत आहे.'' तो डोळे मिटून म्हणाला.
''डोळे मिटून कोणाला पाहिलेत?'' शांतेने विचारले.
''आनंदाला, शांतीला, समाधानाला, प्रेमाला, त्यागाला, मरणाला सारं एका क्षणात पाहिलं.'' तो गूढ रीतीने म्हणाला.
''तुम्ही कोणतं काम कराल?'' मोहनने विचारले.
''सांगाल ते.'' तो म्हणाला.
''तुम्ही साक्षरतेचे वर्ग घ्याल?'' शांतेने विचारले.
''हो, मोठया आनंदानं.'' तो म्हणाला.
''दिवसा गाणी म्हणत खादी खपवा. धनगावमध्यवे हिंडावं. जवळच्या खेडयावर जावं. तुम्हाला सायकलवर बसता येतं का?'' शांतेने विचारले.
''हो. परंतु सायकलपेक्षा घोडा बरा. घोडा वाटेल तेथे जातो. एखादा द्याल लहानसा घोडा मिळवून? त्याच्या पाठीवर गादी घालीन, हातात झेंडा घेईन व गावोगांव जाईन. रात्री येथे वर्ग चालवायला परत येईल. सुंदर काम.'' तो तरुण उत्साहाने म्हणाला.
''परंतु घोडयाला खर्च येईल. त्याला कोठे बांधणार? कोठे ठेवणार? जागा हवी.'' मोहनने विचारले.