क्रांती 75
''जगातील श्रमजीवी जागे होत आहेत. हिंदुस्थानातील किसान जागे होत आहेत. तुम्हीही व्हा. बिहार व ओरिसा प्रांतात किती जागृती मी पाहिली. तेथे शेतकर्यांचे जमिनदारांशी सारखे सत्याग्रह चाललेले आहेत. एकदा एके ठिकाणी गोळीबार झाला. एक शेतकरी गोळी लागून मे ला. त्याच्या अंगातून रक्त वाहिलं. परतुं त्याची शूर पत्नी. तिने आपल्या कुंकवात ते रक्त मिसळलं. कुंकू अधिकच लाल व तेजस्वी झालं. ती ते कुंकू कपाळी लावते व म्हणते, ''माझा पती अमर झाला. माझं सौभाग्य अमर आहे. कोणती बंदूक माझं सौभाग्य हिरावून घेईल?''
''ही पहा ती लाल कुंकवाची डबी. ही डबी त्या सतीनं दिली. तिचं नाव पार्वती. त्या डबीतील कुंकवात त्या शेतकर्याच्या पवित्र रक्ताचा अंश आहे. महाराष्ट्रातील किसान भगिनींस ही देणगी तिनं पाठवली आहे. लावा यातील कुंकू व झगडा करायला उभ्या राहा. पतीच्या बरोबर कडेवर मुलाला घेऊन उभ्या राहा. तेजस्वी व्हा. निश्चयी व्हा. सावित्रीनं यमापासून आपला पती परत मिळवला. आपण साम्राज्य सरकारपासून, जमीनदारांपासून व सावकारांपासून आपलं सुख व स्वातंत्र्य घेऊन या. अतःपर पडणे नको, रडणं नको. आता एकत्र क्रांतीची गर्जना करा. वरचे खाली ओढा, खालचे वर चढा. येथील स्त्री-पुरुषांनी आसपासचे रान उठवावे. आता स्वस्थ नका राहू. स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे. त्या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण हजारो लाखो शेतकरी एकत्र जमू या. त्या दिवशी कामगार कामं सोडून येतील. विद्यार्थी शाळा-कॉलेजं सोडून येतील. एकत्र येऊन अशी हाक फोडू की, साम्राज्य सरकार थरथर कापेल. आपणाला लुटणारे नरमतील. शरमतील. आपलं भाग्य जवळ येईल.''
''लावा, भगिनींनो, यातील कुंकू लावा. कोण घेतं ही डबी? कोणी तरी या पुढे व ही डबी घेऊन लावा सर्वांना कुंकू. तुम्ही गीताबाई ना? या. गीताच नवमंत्र देते. मरणाचा डर उडवते. निशंःकपणे झुंजायला प्रवृत्त करते. ज्यांच्या कपाळी कुंकू असेल त्यांना लावा हे पवित्र कुंकू. तुमचे कुंकू लावून होईपर्यंत मी गाणं म्हणतो. आता नवीन गाणी सर्वत्र गेली पाहिजेत. भिंतीवरून मंत्र लिहिले पाहिजेत. चीनमध्ये खेडयापाडयांतून सर्वत्र स्वातंत्र्याची वचनं लिहिलेली असतात. तुमच्या घराची भिंती रंगा, 'शेतसारा, कमी करा, खंड कमी करा, कर्ज रद्द करा, बेकाराला काम द्या.' अशी वचनं लिहा जिकडे तिकडे, रंगवा दगडाधोंडयावर, झाडामाडांवर. अशा अर्थाची वचनं म्हणजे आपले मंत्र. कुंकू लावून होईपर्यंत आता एक गाणे ऐका.
उठू दे देश, उठू दे देश
येथून तेथून सारा पेटू दे देश, पेटू दे देश ॥ धृ.॥
कोटी कोटी आता उठू दे किसान
निर्भयपणे आपुली उंच करो मान
मुक्तकंठे गावो स्वातंत्र्याचे गान
नष्ट करू आता आपले सारे क्लेश । उठु.॥
कमावता तुम्ही गमावता कसे
सिंह असून तुम्ही बनला रे कसे
तेजे उठा आता पडा ना असे
माणसे बना आता बनु नका मेष ॥ उठु.॥
रात्रंदिवस तुम्ही करितसा काम
जीवनात तुमच्या उरला नाही राम
घाम गळे तुमचा हरामाला दाम
येवो आता तुम्हा थोडा तरी त्वेष ॥उठु.॥
मोर्चे काढू आता निघु दे फौजा
लुटारूंच्या आता थांबवू या मौजा
चालू देणार नाही कोणाच्या गमजा
कोटी किसानांचा फणा करी शेष ॥ उठु.॥