क्रांती 46
''चित्रकार एकूण बरंच बोलतात.'' रामदास म्हणाला.
मुकुंदराव निघाले. माया व रामदास त्यांच्या पाया पडली. यात्रेकरू गेला. कोठे गेला? कोणत्या यात्रा ते करणार होते? हत्तीसारखे झुलणारे पंडये व बडवे जेथे देवाचे रखवालदार असतात, तेथे का ते जाणार होते? नाही. एके काळी त्या यात्रा त्यांनी केल्या. आत्ता निराळया यात्रा. कामगारांच्या झोपडया, किसानांची चंद्रमौळी घरे-ही आता यात्रेची ठिकाणे. शंकराचार्यांच्या पीठांतून, न्यायमीमांसकांच्या पाठशाळांतून, वेदवेदान्ताच्या तत्त्वज्ञानमंदिरांतून ज्ञान मिळविण्याची त्यांना आता इच्छा नव्हती. किसानसंघ, कामगारसंघ यांच्या क्रांतिकारक चर्चा त्यांना ऐकावयाच्या होत्या. अन्नब्रह्माची सर्वांना भेट करून देईन अशी प्रतिज्ञा करणार्या तत्त्वज्ञानाची त्यांना आता तहान होती. हे तत्त्वज्ञान कोठे मिळणार? कामगार-वस्तीतील एखाद्या खोलीत. त्या खोल्या म्हणजे शिवालये, ज्ञानमंदिरे. शंकरांनी जगाला जगविण्यासाठी विष घेतले, परंतु जगाने त्यांना स्मशानात स्थान दिले. किसान-कामगार जगाला सुखविण्यासाठी आजपर्यंत कडू विष पीत आले, त्यांना बक्षीस काय मिळाले? उपासमार व रस्ता झोपायला. ही अपमानाची काळकूटे पिणारा शिवशंकर आता रुद्र होणार आहे व पातक्याचे भस्म करणार आहे. तीच क्रांती.
मुकुंदराव कलकत्त्यास आले. तेथे लाखो कामगार पोलादी संघटना निर्मीत होते. कामगारांच्या संघांची त्यांनी चौकशी केली. संघाच्या कचेरीत ते गेले. जगातील कष्टाळू जनतेला हाक मारणारा व धीर देणारा लाल बावटा कचेरीवर फडकत होता. कचेरीत कामगार-कार्यकर्ते जमले होते. दिवसभर ते काम करीत होते व पुन्हा कचेरीत येत, नवीन ज्ञान मिळवीत. मुकुंदराव तेथील सर्व गोष्टी पाहत होते. एका तसबिरीने त्यांचे लक्ष वेधले.
''कोणाची ही तसबीर?'' त्यांनी विचारले.
''हुतात्मा युसूफची.'' हलधरने सांगितले.
''कोठला हा? काय आहे कथा?'' मुकुंदरावांनी प्रश्न केला.
''ती एक दिव्य कथा आहे. करुण कथा आहे. स्फूर्ती देणारी कथा आहे.'' चंद्रशेखर म्हणाला.
''मला सांगा.''
हलधरने तो इतिहास सांगण्यास आरंभ केला.
''युसूफ हा एक कामगार होता. किसान-कामगारांचं दैन्य जावं म्हणून किती त्याला कळकळ. परंतु जोपर्यंत किसान-कामगारांत संघटना नाही आणि विचारांचा भक्कम पाया त्या संघटनेला नाही, तोपर्यंत डोकं वर होणं अशक्य असं तो म्हणे. त्यानं आपलं सारं आयुष्य, क्षण न् क्षण, शेवटचा श्वासोच्छ्वासही कामगारांना जागृत करण्यात, त्यांना ज्ञान देण्यात घालवला. एक साधा कामगार, परंतु तो पेटलेला ऋषी बनला. कामगारांची तो अभ्यासमंडळं चालवी. त्यांना लिहायला, वाचायला शिकवी, त्यांच्यात सारखा हिंडे-फिरे. रिकामा तो कधीच नसायचा. कामगारांच्या संपाच्या वेळेस त्याला पकडण्यात आलं. तुरुंगात त्याची प्रकृती बिघडली. अती श्रमाने तो आधीच थकला होता. तुरुंगातून तो क्षयी होऊन बाहेर पडला.
''परंतु बाहेर येताच पुन्हा त्याचं काम सुरू. तो शिकवायचा, खोकला उसळायचा, घाबरे. परंतु पुन्हा खोकला थांबला की चीनमधील, रशियातील, स्पेनमधील इतिहास सांगावयास प्रारंभ करी. त्याच्या थुंकीतून रक्त पडू लागलं, तरी तो विश्रांती घेईना. त्याचे डोळे खोल गेले. तो अस्थिपंजर झाला. परंतु युसूफ स्वस्थ बसत नसे. आम्ही त्याला एका मोफत दवाखान्यात ठेवलं, परंतु तेथेही त्याचं काम सुरू. खाटांवरून जे शेजारी इतर रोगी असत, त्यांना तो म्हणे, 'तुम्ही गरीब आहात. बरे झालात म्हणजे संघटनेत शिरा; किसान-कामगारांची संघटना. नवीन ज्ञान मिळवा.' युसूफनं दवाखान्यात ज्ञानमंदिर उघडलं. ती बाटल्यातील औषधं ! ती कुठवर पुरणार? खरा रोग उपासमारीचा. गरिबांना घाणेरडी जागा, निःसत्त्व व तेही अर्धपोटी अन्न, बाटल्यातील औषधं काय करणार? क्रांतीची संजीवनीमात्रा हवी. मरणारा यूसफ तो संजीवनी मंत्र जगणार्यांना शिकवीत होता. शरपंजरी पडलेल्या भीष्मांनी धर्माला शेवटचे ज्ञान देऊन प्राण सोडला. गळयात फोड झाले होते व डॉक्टर बोलू नका सांगत होते, तरी श्रीरामकृष्ण परमहंस बोलत होते. तसाच हा ऋषी यूसफ, चार शब्द बोलला की दमे, जीव घाबरे. जरा थांबून पुन्हा बोले, 'ज्ञान मिळवा. विचार-प्रसार-संघटना. किसान-कामगारांचं राज्य. इन्किलाब झिंदाबाद' हे त्याच्या ओठावरचे शेवटचे शब्द, हे त्याचं रामनाम.''
मुकुंदरावांनी यूसफच्या तसबिरीला वंदन केले. ''कामगाराच्या मोक्षाची दिशा दाखवणारा जगाला अज्ञात असा हा रामकृष्णांचा 'झोपडीतील नवा अवतार'' ते पूज्य भावनेने म्हणाले.