भारताची दिगंत कीर्ति 1
''आई, भारतमातेचें हें चित्र जवळ होतें म्हणून मी वांचलों. जपानी मारणार होते मला. त्यांनी माझी झडती घेतली. झडतींत हें चित्र सांपडलें. 'देशावर प्रेम करतोस' त्यांनी मला प्रश्न केला. मी हो म्हटलें. तें चित्र माझ्याजवळ असूं दे. मग गोळी घाला मी म्हटलें. त्यांनी मला गोळी नाहीं घातली. कैंदी केलें. पुढें आझादसेनेंत गेलों. नेताजींची वाणी ऐकली. ते अमर अनुभव ! आई, आम्ही गवत खाल्लें, उपाशीं लढलों. असें युध्द जगांत झालें नसेल.''
''परंतु उपयोग काय ? स्वातंत्र्य कोठें आहे ?''
''येत आहे.''
''पुन्हां का युध्द करावें लागणार ?''
''काँग्रेसचा तसा मानस नाहीं. वाटाघाटींतून त्यांना हवें आहें. म्हणजे फाळणी येणार.''
''परंतु त्यानें तरी प्रश्न सुटतील का ?''
''आई, नौखाली, कलकत्ता येथें काय झालें ? बिहारमध्यें काय झालें ? महात्माजी धीर देत आहेत. अनवाणी हिंडत आहेत. अश्रु पुशीत आहेत. परंतु हिंदु मुसलमानांच्या या दंगली कधीं थांबणार ? जेथें ते बहुसंख्य तेथें द्यावें त्यांना स्वातंत्र्य. परंतु शान्ति येवो.''
''येईल का ?''
''आशेनें मनुष्य काम करतो. प्रभूचे हेतु अतर्क्य आहेत. आई कोणाला नांवें ठेवायचीं ? आपल्या संकुचित धर्मामुळें पाकिस्तान निर्माण होत आहे. आपण आपल्याच कोठयवधि बांधवांना कमी लेखलें. ते परधर्मांत गेले. काश्मीरमधील सारे मुसलमान ७५/८० वर्षांपूर्वी स्वधर्मांत येऊं इच्छित होते. आम्ही अब्रम्हण्यं म्हटलें. अस्पृश्य मुसलमान वा ख्रिस्ती होऊन आला तर विहिरीवर पाणी भरतो, ओटीवर बसतो. हरिजन दूर ! कोठें पेच्डायचीं हीं पापें ? तरी डोळे उघडत नाहींत. अजून गोव्यांत हरिजनांना मंदिरें मोकळीं नाहींत, हॉटेलें मोकळी नाहींत. आपलें फार पाप झालें. धर्म, तत्वज्ञान अव्दैताचें. कृति भाऊबंदकीची, संकुचितपणाची, माणुसघाणेपणाची. अत:पर तरी डोळे उघडोत.''
अशीं बोलणीं चालत. कधीं रंगाच्या आठवणी येत. सारीं रंगत. कधीं पंढरीं युध्दस्य रम्या वार्ता सांगे. रडवी, उचंबळवी. देशाचें काय होतें इकडे सर्वांचे डोळे होते. शेवटीं १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश जाणार, सत्ता सोडणार असें घोषित झालें. देशाची फाळणी होणार. परंतु ४० कोटि मुक्त तर होतील ना ? जनता आनंदली. त्या आनंदांत विषण्णता होती. ती आपल्या परंपरित पापाची होती.