मामाकडे 5
''काय करावें या पोराला. दिवे लागले तरी याचा पत्ता नाहीं ? विहीर खणून तेल आणतो कीं काय ? लाडोबा आहे करुन ठेवलेला'' मामींचे तोंड सुरु झालें.
''किती रे उशीर'' आई त्रासून म्हणाली.
''आई !''
''काय ?''
''मी तेल नाहीं आणलें. हे चित्रांचे पुस्तक आणलें. तूं रागावूं नको. बाबा वाढदिवशीं रंगाची पेटी देणार होते. खरें ना आई ?''
''चित्रें विकत आणलींस ? काय बाई तरी पोर. चुलींत घालत्यें दे तीं चित्रें. ठेवा लाडावून. उद्यां तुरुंगांत जायचीं ही लक्षणें आहेत'' मामी ओरडली.
आईनें रंगाला मारमार मारलें.
''आणशील पुन्हां चित्रें ? आणशील ? आणशील ?''
''आई नको मारुं. रक्त आलें आई.''
''येऊं दे रक्त. मरत नाहीं मेला. छळवाद्या आहेस नुसता.''
मामा बाहेरुन आले.
''काय, काय आहे हें ?'' त्यानीं विचारलें
मामीबाईंनी तिखटमीठ लावून सारें सांगितलें.
''थांब आज तुझी गय नाहीं'' असें म्हणून टेबलावरच्या रुळानें मामा मारुं लागले.
''दादा, मी त्याला मारलें आहे. तूं आणखी नको मारुं. कोठें जाईल तो पोर ?''
''घे तुझा पोर. तो चांगला व्हावा म्हणूनच ना मारलें ? त्याला मारण्याचा तुलाच फक्त अधिकार वाटतें ? आणि खायला घालणार्याला हक्क नाहीं ? माझ्याकडे राहायचें असेल तर असे प्रकार चालणार नाहींत. तूं आपला पोरगा घेऊन कोठेंहि जा. सुखी असा. मी म्हणून तुम्हांला आणलें. नाहीं तर हल्लींच्या दिवसांत कोण कोणाला विचारतो ? तरी मी त्याला कधीं हात लावित नाहीं. भाऊ वाईट, त्याची बायको वाईट. चांगली तेवढीं तुम्ही दोघें मायलेंकरें !''
''दादा, मी कधीं तुम्हांला वाईट म्हटलें ?''