रंगाचें आजारीपण 3
''दोनहून अधिक आहे. मी कपाळावर कोलन वाटरची घडी ठेवतों. बरें का.''
वासुकाका त्याच्याजवळ बसून होतें त्याचें मधून अंग चेपीत, पाय चुरीत. मधेंच त्याच्या तप्त मस्तकावर आपला वत्सल हात ठेवीत. रंगा डोळे मिटून पडून होता. त्याला का झोंप लागली होती ?
दहा वाजून गेले.
''शाळेंत जाणार ना ?'' सुनंदानें येऊन विचारलें.
''आजच ताप आला असावा. एखादे वेळेस कदाचित् घाम येईल. बघूं आजचा दिवस वाट.''
''जातांना वाटेंत डॉक्टरांना सांगून जा. ते येऊन बघून जातील. मी औषध आणीन. वेळींच जपावें. ते घामाचें औषध देतील.''
''बरं. मी त्यांना सांगतों. तूं वाढ पान.''
वासुदेवराव उठले. त्यांनीं हातपाय धुतलें. ते पानावर बसले.
''त्याला खायला नको कांही देऊं. मोसंबी आण. दूध कॉफी दे.''
''डॉक्टरांना मी विचारीनच काय द्यायचें तें.''
जेवण झालें. शाळेंत जायची वेळ झाली. रंगा पडून होता. वासुकाका क्षणभर त्याच्याजवळ बसले. रंगानें डोळे उघडून बघितलें.
''मी शाळेंत जाऊंना रंगा ?''
''हो जा. माझी रजा सांगा. ताप निघेल, नाहीं काका ? मला आतां बरें वाटतें. जा तुम्ही.''
ते उठले नि गेले. सुनंदानेंहि स्वत:चें जेवण वगैरे आटोपलें. आणि डॉक्टर बाराच्या सुमारास आले. त्यानीं तपासलें. औषध पाठवतों ते म्हणाले.
''खायला काय ?''
''गोड ताक, दूध, मोसंब्याचा रस द्या. अन्न नको.''
''साधाच आहे ना ताप ?''
''साधा नसावा. एक दोन दिवसांत लक्षणें नक्की दिसतील.''