स्वातंत्र्याच्या युध्दांत 11
एकदम स्वातंत्र्याचा सारा लढा डोळ्यांसमोर आला. माय माउली कस्तुरबांचें मरण, महात्माजींचा उपवास, आचार्य भन्साळींचें दिव्य, मुलांबाळांचीं बलिदानें ! ती विचारमग्न होती. आणि सुभाषबाबू कोठें आहेत ? खरेंच का ते तिकडे स्वतंत्र सेना उभारित आहेत ? मायभूमीचा महान् पुत्र, यज्ञमय जीवन, मायभूमीचें स्वातंत्र्याशी लग्न लावीन, माझ्या लग्नाचा विचारच माझ्या मानांत येत नसतो असें म्हणणारा, विवेकानंदांची जणूं प्रतिकृति ! नयना ध्यानस्थ बसली.
''नयना, नयना'' कोणी तरी येऊन तिला मिठी मारली.
''कोण, मणि ? तूं आलीस ?''
''आईला म्हटलें जातें. नयनाचे डोळे पुसायला. आतां आमच्याकडे चल. येथें नको राहूं.''
''मला सुनंदा आईकडे जायला हवें मणि.''
''आधीं माझ्याकडे.''
नयना नि मणि घरभर हिंडलीं. नयना तिला सारें दाखवित होती. मधून दु:खी होत होती.
''मला सातारा दाखव नयना.''
''सारें दाखवीन.''
आणि मोटारींतून दोघं सर्वत्र हिंडलीं. माहुली क्षेम पाहून आलीं.
''तूं मेरुलिंग येशील बघायला ?''
''हां''
''चालावें लागेल''
''मी चढेन, चालेन''
दोघीजणी गेल्या. किती सुंदर दृश्य ! एकेठिकाणीं हात धरुन तिला नयनानें वर ओढून घेतलें. तो सारा डोंगर पाझरत होता. सभोंवतीं फुलेच फुले. मणि गुलाबाचीं फुले तोडित होती. नयनानें सोनचापत्रयांची काढलीं.
''आपण वर जायचें ?''
''तिकडे वाघाच्या गुहा आहेत.''
''आपण बसूं एकींत. येतेस नयना ?''
''नको.''
मणि येथून सारें पुन:पुन्हां बघत होती. भव्य निसर्ग !
नयना नि मणि उंचावरुन खालीं आली. परत तीं सातारला आलीं.