नवीन अनुभव 3
''दरसाल राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वेळेस आम्ही प्रदर्शन भरवतों. तुम्ही तेथें येत जा. यंदां महाराष्ट्रांत खेड्यांत अधिवेशन व्हायचें आहे. फैजपूरला. तेथें शान्तिनिकेतनचे प्रख्यात कलावान् नंदलाल येणार आहेत. ते ग्रामीण वस्तूंतूनच सौंदर्यनगरी निर्माण करणार आहेत. रंगा, तुम्ही तेथें या. तुमची कला वाढेल, वाढत्या राष्ट्रीय आकांक्षांशीं ती जोडली जाईल. कला म्हणजे दैवी वस्तु. कलेची हांक हृदयाला जाऊन पटकन् पोंचते. देवाचे तुम्ही आवडते लोक.''
''मला तेथें कोण येऊं देईल ?''
''आम्हीं आहोंत ना ? आतां ओळख होईल ती वाढतच जाईल.''
रंगा प्रदर्शनांत काम करुं लागला. मांडामांड कशी करावी, कोठलें चित्र कोठें टांगावें, कोठला फलक कोठें शोभेल, तें तो सांगे. पुन्हां रागवत नसे. समजून देई. रंगा सर्वांचा आवडता झाला.
परंतु त्याला कामाचा ताण फार पडला. तो थकला. प्रदर्शन संपलें. त्याला प्रशस्तिपत्रें मिळालीं. कांही सन्मान्य वेतनहि मिळालें. ओळखी झाल्या. परंतु तो आजारी पडला. खोलींत पडून राहिला. अजून थोडी सुटी होती. खोलींतील इतर मुलें आलीं नव्हतीं. रंगा एकटाच होता. तो रंगवायला बसे. परंतु पाठ दुखूं लागे. तो आंथरुणावर पडे.
''रंगा काय होतें ?'' शेजारच्या ताईनें येऊन विचारलें.
''बरें नांही वाटत. थकवा वाटतो.''
''तूं रात्रंदिवस काम करित असस. मी सांगत होतें इतकं नको करुं काम. मध्यें कांही दिवस तर दिवसरात्र तिकडेच असस. मी म्हणें गेला तरी कुठें. आतां विश्रांति घे. स्वयंपाक नको करुं. मी देत जाईन जेवायला. चार दिवस तूं आम्हांला जड नाहींस. आणि बहिणीला भावाचें का कधीं ओझें वाटतें रंगा ?''
ताईनें रंगाची खोली झाडली. तेथलीं भांडीं वगैरे स्वच्छ करुन ठेवलीं. ती त्याच्याजवळ बसली होती. त्याचें डोकें थोपटीत होती.
''आई, भाऊला बरें नाहीं ?''