वादळ 1
रंगानें मृताचें सारें केलें. तो आतां ताईकडे नसे रहात. पहिल्या दिवशीं होता. नंतर येई जाई. ताईचें काय करायचें हा प्रश्न होता. तें बिर्हाड मोडायचें का ? ठेवूं म्हटलें तर भाडे कोठून द्यायचें ? ताईचे फार शिक्षण नव्हतें झालेलें. लिही वाची. परंतु शेवटी परीक्षा कुठलीच नाहीं.
''ताई, तूं दुधगांवला जातेस ? सुनंदाआईजवळ रहा. त्याहि एकट्या असतात. आजारी असतात. त्यांना बरें वाटेल. येथें मुंबईत कशी राहशील ? येथील जीवन खर्चाचें. मी तिकडे तुम्हां दोघींना पैसे पाठवीन. रहा दोघी शान्तपणें.''
''रंगा, कांही दिवस इथेंच राहूं दे. हा सारा पसारा आटपायचा. हें सामान''
''तें मालगाडीनें दुधगांवला पाठवून देऊं. उगीच माशा मारीत येथें कशाला रहायचें ? तुला शिकायची इच्छा आहे का ? परंतु बापुसाहेबांना भेटून कांही खटपट करायला हवी. आतां पुढील वर्षीच. शिकायचें आहे का तुला ?''
''तुझी इच्छा असेल तर मी शिकेन.''
''तुझी इच्छा हवी.''
''मला इच्छा नाहीं. माझी सारी इच्छा मी तुला दिली आहे.''
समोर समुद्र उचंबळत होता. केवढी भरती ! रंगा सागराकडे बघत होता नि ताई रंगाकडे बघत होती. कोणी बोलत नव्हतें. एकदम रंगानें ताईकडे पाहिलें. त्याचे डोळे खाली झाले.
''रंगा, बघ ना माझ्याकडे. माझे डोळे वाईट नाहींत. ते प्रेमळ आहेत. बघ, माझ्याकडे बघ. खालीं नको बघूं. तो समोर समुद्र उचंबळतो आहे ना तसें माझें हृदय उचंबळत आहे. काय सांगूं कसें बोलूं ? रंगा, तूं रागावलास ? बघ माझ्याकडे.''
त्यानें तिच्याकडे पाहिलें नि समोरच्या समुद्राकडे तो शून्य दृष्टीनें पाहूं लागला.
''तो समुद्र तुला आवडतो, माझा हृदयसमुद्र नाहीं आवडत ? थाडथाड लाटा या हृदयांत उसळत आहेत. तुफान आहे हृदयांत. तूं ये नि शान्त कर. रंगा, रंगा, काय सांगू ? तूं का मला सोडून जाणार ? रंगा, तूं माझा हो. माझा संसार पुन्हां मांड. बिर्हाड मोडायचें कशाला ? पुन्हां मांडू. छान मांडूं. माझें जीवन रंगव. लिली आपल्या पोटीं येईल. रंगा, मला निराश नको करुं. माझें जीवन तूं व्यापलें आहेस. माझ्या अणुरेणूंत तूं आहेस. माझा श्वासोच्छवास तुझा. या माझ्या देहांत तुझा आत्मा. तुझा प्राण. मला अनाथ नको करुं.