मुंबईस 2
''खरोखर ज्याच्या डोळ्यासमोर भारत आहे, त्याला अनन्त विषय आहेत. आजचा भग्न परंतु डोकें वर काढणारा भारत आहेच, परंतु दहा हजार वर्षांची सहस्त्ररंगी परंपरा आहे. जों भारताच्या संस्कृतींत रंगला, आजच्या राष्ट्रीय उत्थानांत रंगला, त्याच्या डोळ्यांसमोर सहस्त्रवधि प्रसंग उभे राहतात. ग्रामोद्योगी चित्रें, दारुबंदीचीं चित्रें, परदेशी मालावर निरोधन करणार्यांची चित्रें, झेंडे घेऊन निघणार्या वानरसेना, लाठीमारानें न दबणार्या मायभगिनी, ग्रामसफाई करणारे सेनापति, गांधीजींचा येरवडामंदिरांतील उपवास, तेथील रवीन्द्रनाथांची नि त्यांची भेट-एक का दोन शतावधि प्रसंग.''
''तुम्ही येणार का बोला. तुम्ही तुमच्या कल्पना सांगत जा, येणार्या ग्राहकांना पटवा. त्यांना पटलें तर तसें चित्र चितारा.''
''ठीक. कांही दिवस हा अनुभव घेतों. परंतु मी आत्मा विकीत आहें असें वाटलें तर मला केव्हांहि मुक्त करा. मला करारानें नका बांधूं. माझा आत्मा मुक्त ठेवा.''
''कबूल.''
करार झाला. रंगा त्या संस्थेंत कामाला जाऊं लागला. परंतु घरीं आल्यावर तो स्वत:च्या कल्पना रंगवित बसे. त्यानें एक फारच सुंदर चित्र तयार केले होतें. महात्माजी समुद्रतीरावर सत्याग्रहासाठीं उभे आहेत असें तें चित्र होतें. अति भव्य असें तें चित्र होतें. स्वातंत्र्याची उषा पचंकत आहे, समुद्र समोर उसळत आहे आणि एक महान् पुरुष गंभीरपणें बंड करायला उभा आहे. डोक्यावर विमानें आहेत. दूर बंदुकवाले आहेत. त्या चित्रांत सारी दृष्टि जरी महात्माजींवर खिळली तरी सभोवतालची सृष्टीहि पार्श्वभूमीप्रमाणें मोठी परिणामकारक अशी तेथें चितारलेली होती.
खोलींत रंगा एकटाच होता. आज सारे सिनेमाला गेले होते. आठाची वेळ असेल. रंगा तांदूळ निवडीत होता. शेगडी फुलली होती. निखार्यांवर आधण होतें. पलीकडच्या खोलींत त्याचें तें चित्र तेथें होतें. तो शेवटचे कलात्मक स्पर्श करित होता.
इतक्यांत दारांतून कोणी तरी आंत आलें. ती मूर्ति रंगाकडे अनिमिष नेत्रांनी बघत होती. किती तरी वेळ झाला. रंगाचें तांदूळ निवडणें संपलें. तो उठला. आलेल्या व्यक्तीची नि त्याची दृष्टादृष्ट झाली. दोघें एकमेकांकडे बघत होतीं.
''नयना, केव्हां आलीस तूं, ये बस.''
''मी किती वेळ उभी आहे. तूं चित्रांत रंगतोस तितकाच तांदूळ निवडण्यांतहि रंगतोस.''
''कलावंतानें सर्वत्र कला न्यावी. तांदूळहि नीट निवडावे.''
नयना तेथें लहान चटयीवर बसली. रंगा कसला तरी विचार करित होता.