भारत-चित्रकला-धाम 7
''ताई, रामाची भक्त हो.''
''मी आधीं तुझी पूजा केली मग या रामाची.''
''तूं त्याच्याजवळ काय मागितलेंस ?''
''मागितले की रंगा मला दे. तूं काय मागितलेंस ?''
''ताई माझी बहीण कर.''
ती न बोलतां निघून गेली.
रंगा मंदिरांत चित्रसृष्टींत रंगला होता. आज घरीं एक मोठें पत्र आलें होतें. तें मुंबईहून इकडे परत पाठवण्यांत आलेलें होतें. पत्र युरोपांतून आलें होतें. ताईच्या तें हातीं पडलें. कोणाचे पत्र ? तिला शंका आली. तिनें तें पत्र फोडलें, वाचलें. कोणाचें पत्र ?
''प्रिय रंगा
तुला मी परत भेटलें नाहीं. मी साधी सामान्य मुलगी. मी दुरुन तुझी प्रेमपूजा करित असते. बाबांबरोबर युरोपच्या प्रख्यात चित्रशाळा बघत हिंडत आहें. तूं बरोबर असतास तर ? परंतु तुला मिंधेपणा वाटला. तुम्ही पुरुष मोठे स्वाभिमानी असा. स्त्रिया प्रेमाला सर्वस्व देतात. आज एका सरोवराच्या तीरावर मी आहें. अद्भुत दृश्य. परंतु मी तुझ्या प्रेमसरोवरांत विहरत आहें. येथलीं सुंदर फुले तोडून मी पाण्यांत सोडित बसतें. तुझें नांव घेतें नि फूल पाण्यांत सोडतें.
युध्दचें वातावरण सर्वत्र आहे. केव्हां भडका उडेल नेम नाहीं. बाबा परत फिरायचें म्हणत आहेत. मीहि यायला उतावीळ आहें. तुला बघायला भेटायला येऊं ? पुन्हां दहीभात जेवूं घालशील ? परंतु त्यावर कितीदिवस समाधान मानूं ? तूं माझ्या हातचा दहीभात खाणारा नाहीं का होणार ?
बाबांजवळ मी अजून बोललें नाहीं. परंतु माझी जीवनगंगा तुझ्या जीवनसागरांत विलीन व्हायला अधीर झाली आहे. बाबा तिला रोखूं शकणार नाहींत. त्यांचे प्रेम, त्यांची संपत्ति, सारें सोडून नयना तुझ्याकडे येणार. गरिबाकडे गरीब होऊन येईल. 'मी आवडत असेन तर गरीब होऊन ये. मला श्रीमंत करण्यापेक्षां तूंच कां नाहीं दारिद्र्याला वरीत ?' असें तूं म्हणाला होतास. येतें आतां. दारिद्र्याला वरुन मग तुला वरायला येतें. बाबा काय म्हणतील ? त्यांची मी एकुलती मुलगी. ते का कठोरच राहतील ? त्यांचे वात्सल्य त्यांना शेवटीं विरघळवील.
रंगा, माझें जीवनचित्र रंगवणारा तूंच हो.
तुझी नयना