ताईची भेट 8
त्यानें रस दिला. तो पाय चेपीत बसला.
''तुम्ही जेवा जा. उशीर झाला आहे. बरीच रात्र झाली. जा. जेवा.''
तो उठला नि आंत गेला.
''ताई वाढ पान. तुझ्याहि भावना मी ओळखायला हव्यात. वाढ भाजी भरपूर.''
तिनें पान मांडलें.
''तूंहि माझ्याबरोबर बस. मागून कशाला ?''
''रंगा, आपण एकाच ताटांत जेवूं.''
''तूं वेडी आहेस ताई. आपण का लहान बाळें ?''
तिनें आपलें ताट वाढून घेतलें. दोघें जेवलीं. तिनें त्याच्यासाठीं स्वच्छ आंथरुण घालून दिलें. धुतलेले चादर, स्वच्छ अभ्रयाची उशी.
''ताई, त्यांच्या आंथरुणावरची चादर कधीं बदलली होतीस, त्यांच्या उशीचा अभ्रा कधीं बदलला होतास ?''
''रंगा, त्यांची सेवा करण्याइतकें मोठें मन माझें नाहीं. मला त्यांचा वीट आला आहे. त्यांचे शब्द मी कसें विसरुं ? केलेलें छळ कसें विसरुं ? लिलीचें मरण कसें विसरुं ?''
भाऊ बोलला नाहीं. त्यानें अमृतरावांना हळूच कुशीवर केलें. इकडची चादर गुंडाळून घेतली. पुन्हां इकडे करुन तिकडून काढून घेतली. मग स्वच्छ चादर त्यानें घातली. उशीला नवा अभ्रा घातला.
''ताई, धुतलेला शर्ट आहे ?''
''आहे.''
''दे आणून.''
त्यानें त्यांच्या अंगांत स्वच्छ सदरा हलकेच घातला.
''रंगा, तुम्ही मला नवीन करित आहांत, निर्मळ करित आहांत, देवाकडे सुंदर करुन, सुंदर कपडे घालून पाठवित आहांत. होय ना ? तुम्ही आतां निजा. दमलांत. मी आतां बरा होईन. कायमचा बरा. पुन्हां नको आजारीपण.''