सुनंदाची तपश्चर्या 3
''प्रभूची इच्छा तसें होईल'' तो दु:खानें म्हणाला. रंगाची गाडी निघाली. मनानें तो कधींच सुनंदा आईच्या चरणापाशीं पोंचला होता. देवा, कां रे असें होतें ? काका गेले, आतां आईहि जाणार का ? जन्म देणारे मायबाप नेलेस. माझ्या मनोबुध्दीला रंगरुप देणारे मायबाप, तेहि तूं नेत आहेस. मला कोण ? मी का नेहमीं एकाकी राहणार ? अनेक विचारांत रंगा बुडून गेला होता.
दुधगांवला तो आला. पहांटेची वेळ होती. पुढच्या भागांत भाडेकरु होता. रंगाने दार ठोठावलें.
''कोण आहे ?'' एका आजीबाईनें दार उघडून विचारलें.
''मी रंगा.''
''तुमची आई पाठीमागें रहाते. तुमची आठवण काढते.''
रंगा पाठीमागें गेला. सुनंदा आंथरुणांत होती.
''देवा, रंगा सुखी ठेव.'' असें ती म्हणत होती. तों दारावर आवाज झाला.
''कोण आहे ?''
''आई, मी.''
''रंगा ? तूं एकदम कोठून आलास बाळ ?'' दार उघडीत तिनें विचारलें.
''आई, तूं किती वाळलीस ? किती थकलीस ? तूं कां नाही मला कळवलेंस ? मास्तरांनी कळविलें म्हणून आलों. तुझ्यापासून मी आतां दूर जाणार नाहीं. येथल्या शाळेंतहि नोकरी मिळेल असें त्या मास्तरांनी लिहिलें आहे.''
''आतां जरा पड. जागरण असेल. नीज माझ्याच आंथरुणावर. मी उठतें आतां. चूल सारवतें.''
''आई, तूं निजून रहा. तुझे पाय मी चेपतों. मी चूल सारवीन, सारें करीन. तूं आतां विश्रांति घ्यायची.''
परंतु सुनंदानें रंगालाच निजविलें. आणि त्याला झोंप लागली. तिनें चूल सारवली. कोको केला.
''बाळ, ऊठ आतां. कोको घे. मग आंघोळ करुन झोंप'' सुनंदा त्याला म्हणाली. रंगा उठला. प्रातर्विधि उरकून तो तेथें आईजवळ बसला.
''तूं आतां श्रमूं नकोस. नको शिवण काम, नको कांही, तूं आई कांही घेत नाहींस''
''काय घेऊं रंगा ?''