ताईची भेट 5
''ही बुध्दि आज बरी सुचली ?''
''प्रभूची कृपा.''
तिनें त्याला कार्ड दिलें. त्यानें लिहिलें.
''यावर पत्ता लिही. तुला कांही लिहायचें असले तरी लिही'' तो म्हणाला.
परंतु तिनें कांही लिहिलें नाहीं.
''प्रिय रंगा
मी तापानें अत्यवस्थ. वांचेन असें नाहीं. तुमची क्षमा मागूं इच्छितों. मरणशय्येवर असणार्याची इच्छा पूर्ण करा.''
अशा अर्थाच्या त्या दोन ओळी होत्या. तिनें पत्ता लिहून कार्ड टाकलें. तिच्या मनांत अनेक शंका येत होत्या. रंगा त्या खोलींत असेल का ? त्यानेंहि खोली बदलली असेल. त्याला तेथें आमच्या आठवणी येत असतील. कसा राहील भाऊ तेथें ? आणि त्याच्या घरीं काय अवस्था असेल ? घर, कोठें आहे त्याला घर ? वासुकाकांचें घर. सुनंदा आईचें घर. कोठें असेल रंगा ? किती दु:खीकष्टी असेल ? परंतु असला तर येईल का ? ज्यानें अपमान केला, नाहीं नाहीं तें जो बोलला, त्याच्याकडे येईल का तो स्वाभिमानी मुलगा ?
रंगाला पत्र मिळालें. तो बुचकळ्यांत पडला. त्याला सर्व आठवणी आल्या. ताई, लिली सारीं डोळ्यांसमोर आलीं. तें भिंतीवर तेथें चित्र होतें. जावें का ताईकडे ? खरें असेल का पत्र ? तो उठला. कपडे करुन बापूसाहेबांकडे गेला.
''काय रे रंगा, बरेच दिवसांनी आलास. जेवायला थांबणार का ? मटार आहे आज''
''बापू, मला जायचें आहे. काम आहे'' असें म्हणून त्यांनें हकीगत सांगितली. तें पत्र त्यानें त्यांना दाखविलें.
''रंगा, जायला हवें बाळ. कसले मानापमान ? सर्वांना एक दिवस मातींत जायचें आहे. तुमचे आमचे अहंकार, त्यांची चिमुटभर राख व्हायची आहे. जा. त्यांची शुश्रूषा कर. आत्मा सर्वत्र ना आहे ? तें अशा वेळेसच अनुभवायचें असतें. जा. तुझ्या ताईला धीर दे. लिलीला भेट. त्यांनाहि बरें कर. त्यांचा पुनर्जन्म होत आहे.''
थोडी पोळी उसळ खाऊन रंगा निघाला.
''आला का ग रंगा'' त्यानें विचारलें.
''नाहीं आला.''
''किती वाजले ?''
''नऊ वाजून गेलें.''