भारत-चित्रकला-धाम 1
ताई दुधगांवला सुनंदाआईकडे रहायला गेली होती. ती तेथें सारें काम करी. सुनंदाआईंना विसांवा देई. एक दिवस आपण रंगाचें मन जिंकूं अशी तिला आशा होती. माझी सेवा, माझी तपश्चर्या फळेल असें तिला वाटत होतें. चित्रें रंगवणारा रंगा, तो का माझें जीवन भकास ठेवील ? त्याला माझी करुणा नाहीं येणार ? परंतु करुणा म्हणजे का प्रेम ? मला हवें आहे तें निराळें प्रेम आहे. संताला सर्व जगाविषयी करुणा वाटते. परंतु त्याची ती करुणा म्हणजे आसक्त प्रेम नसतें. तें निरपेक्ष प्रेम असतें. मी का तशा प्रेमाची भुकेलेली आहें ? मला देहाचें प्रेम हवें आहे. मी अजून साधी सांसारिक स्त्री आहें. माझ्या सामान्य भुका. असामान्य माणसें सामान्य जीवासाठीं खालीं नाहीं का येणार ? ताई अनेक विचार करित असे. ती रंगाला पत्रें लिहायची. तीं पत्रें म्हणजे प्रेमाच्या श्रुतिस्मृति होत्या. कधीं कधीं रंगाला वाटे कीं वाचूं नये तीं पत्रें. तोच त्यांत विषय असावयाचा, तीच अनन्त आळवणी. परंतु तो तीं वाचित असे. तो दोन चार ओळींचे पुढीलप्रमाणें उत्तर लिही :
''प्रिय ताई
तूं सुनंदाआईची सेवा करित आहेस. धन्यवाद. तुझा भाऊ तुझा चिरॠणी आहे. तुझ्यासारखी बहीण मला देवानें दिली. माझें केवढें भाग्य ! सुनंदाआईंना जप. तुझें मन शान्त होवो. शेवटीं निरपेक्ष प्रेम हेंच खरें. निरपेक्ष झाल्याशिवाय खरें प्रेम करतांच येत नाहीं. आज तुझें प्रेम माझ्यावर नाहीं. स्वत:च्या वासनांवर आहे. त्यांतून मुक्त होशील तेव्हां आजच्या पेक्षांहि रंगा तुला सुंदर दिसेल. मी भाऊबीजेला घरीं येऊं ? तूं ओवाळणार असलीस तर येईन.''
रंगा.
असें तो लिहायचा. ती रागानें रुसून संतापून लिहायची. माझ्या मनांतील आगडोंब विझव, विझव असें प्रार्थायची. असे दिवस जात होते.
परंतु एक निराळीच घटना घडली. दुधगांवला नदीतटाकीं एका लक्षाधीशानें एक नवीन मंदीर बांधलें. तें मंदीर फार प्रचंड नसलें तरी रमणीय होतें. रामरायांचे मंदीर. अति सुंदर अशा मूर्ति होत्या. ते मंदीर सर्वांना मोकळें होतें. कोणीहि यावें, बघावें, तेथें बसावें. त्या श्रीमंताला मंदिराच्या आंतील भिंतीवरुन भारतीय संस्कृतींतील प्रसंग चितारुन हवें होतें. त्यांना रंगाचें नांव कोणी तरी सांगितलें. एक दिवशीं तो भला मनुष्य सुनंदाआईंकडे आला. रंगा कोठें म्हणून विचारित आला. सुनंदानें त्याचें स्वागत केलें. बोलणें झालें.
''आम्ही गरीब आहोंत. मुंबईची नोकरी सोडून तो कसा हो येणार ?'' सुनंदा म्हणाली.