रंगाचें निधन 5
''हा भ्रम आहे. सारी शक्ति तुझ्यांत आहे. मातीच्या कणांतूनच नवीन सृष्टि उदयास येते. पावसाचा एक थेंबच हिरवी सृष्टि उभी करतो. झाडाचें एक पान, परंतु द्रौपदीनें एक भाजीचें पानच प्रभूला दिलें. त्याला ढेंकर आली. आणि त्या प्रभूला मरतांनाहि एक पानच आधार देत होतें. तें लहानसें पान तुच्छ नको मानूं. तें छाया करुन किड्याला सांभाळतें, दंवबिंदूला पटकन् आटूं देत नाहीं. प्रभूचें वैभव कणाकणांत भरलेलें आहे. त्या विश्वानलाच्या आपण अनंत ठिणग्या, त्या चिदंबराच्या आपण लहान लहान चित्कळा. प्रत्येक वस्तु वा व्यक्ति लहान असून महान आहे असें ते म्हणत. गच्चींतील त्यांची ती अमर वाणी नाहीं का आठवत ? पडून रहा. बरा हो. भारताची कीर्ति दिगंत ने.''
''दे माझे रंग, दे माझे कुंचले. मी अमर चित्र रंगवतों. मरणार्या चित्रकाराचें अमर चित्र. आणा सारें सामान. मला स्फूर्ति आली आहे. हीं बघ बोटें थरथरत आहेत. त्यांना कळा लागल्या आहेत. त्यांतून चित्र बाहेर पडूं इच्छितें. ताई, दे रंग, दे कुंचले.''
''आतां रात्रीं ?''
''रात्रीलाच गंमत असते. मला वर गच्चींत न्या. पंढरीचा तो गालिचा आंथरा. काबुली गालीचावर बसून शेवटचें चित्र रंगवतों. अनंत आकाशाखालीं बसून, अनंताचा स्पर्श अनुभवित, वार्याचा संदेश ऐकत चित्र रंगवतों. त्या गालिच्यावरच आमचें लग्न लागलें. माझा हात आतां एकट्याचा नाहीं. तो बळकट आहे. नयनाची व माझी संयुक्त शक्ति, संयुक्त कला आज या बोटांतून प्रकटेल. पूर्वपश्चिमेनें न कधीं पाहिलेलें असें सौदर्य आजच्या चित्रांत येईल. मी आज विश्वाचा झालों आहें. सार्या दिशा भेदून पलीकडे गेलों आहे. जणूं विश्वाच्या मुळाला मी हात घातला आहे आज. ताई, रंगाचा हा कुंचला आज अनंताला स्पर्श करित आहे. माझ्या समोर सारें विश्वब्रह्मांड या क्षणीं पुंजीभूत होऊन उभें आहे. हे बघ, हे बघ अनंत आकार, असीम आकृति ! प्रभु आज माझ्यासमोर सारें भांडार उघडें करित आहे. अर्जुनाला मिळालेली दिव्य दृष्टि आज मला जणुं लाभली आहे. विराट् कला, विराट् रंगसृष्टि माझ्या सभोंतीं आहे. माझ्याभोंवतीं रंगसिंधु घों घों उसळत आहेत. अनंत आकार नाचत आहेत. आण माझे रंग, माझे कुंचले. हें जें डोळ्यांसमोर दिसत आहे, हें जें क्षणभर समोर चकाकत आहे. लकाकत आहे, तें अमर करुन ठेवूं दे. या छायाप्रकाशांना ब्रशानें पकडून, कुंचल्यांनीं रंगवून अमर करतों. चित्रकाराचें विश्वरुपदर्शन.''
''रंगा, काय बोलतोस तूं ?'' सुनंदानें विचारलें.
''आई, आज मी सांगतों तसें करा. नवबाळाला जन्म देऊं पाहणार्या नव मातेची वेदना मी अनुभवित आहें. मला वर न्या. तेथें रंग, कुंचले, सारें ठेवा. तो मंगल गालिचा आंथरा. सृष्टीशीं समरस होऊन आज मी रंगवीन. विश्वमातेच्या मांडीवर लोळत खेळत मी रंगवीन. तुम्ही तेथें कोणी नका बसूं. चिन्ता नका करुं. रंगा आज अमर चित्र रंगवणार आहे. करा सारी तयारी.''
ताईनें गच्चींत तो गालिचा आंथरला. तेथें टेकायला लागली तर गादी ठेवली. तेथें स्वच्छ तांब्याभांडे ठेवलें. त्याचें चित्रकलेचें सारें सामान तिनें तेथें मांडलें.
''रंगा, चल वरतीं.''