नवीन अनुभव 2
एक दिवशीं तें आपले चित्रफलक, तीं नाना चित्रें घेऊन प्रदर्शन-चालकांकडे तो गेला. तेथे त्याची आधीं दाद लागेना. परंतु ते पहा एक गृहस्थ. ठेंगणेसे आहेत. परंतु डोळ्यांत मधुरता नि करुणा आहे. मुखावर गंभीर प्रसन्नता आहे. रंगाजवळ ते थांबले. ते त्या तरुणाजवळ बोलूं लागले :
''पाहूं तुमचीं चित्रें, आपण तिकडे बसूं चला.'' रंगाला घेऊन ते एका खोलींत गेले. रंगानें आपले फलक मांडले, तीं चित्रें तेथें मांडली. आणि बापुसाहेब चकित झाले.
''फारच सुंदर'' ते म्हणाले.
इतक्यांत तेथें आणखी मंडळी आली. ती चित्रें पाहून जो तो मान डोलवूं लागला.
''प्रदर्शनांत ही चित्रें लावावीं, हे फलक टांगावे. आपल्या व्याख्यानांनीं होणार नाहीं ते या रंगांनी होईल. आम्हांलाहि अशा कल्पना सुचल्या नसत्या. तुम्ही का कोणत्या आश्रमांत होतां ?''
''नाहीं.''
''मग तुम्हांला हें खादीचें तत्वज्ञान कोणी शिकविलें ? ग्रामीण जीवनाच्या अंतरंगांत कसे शिरलांत ? कोण तुमचा गुरु ?''
''वासुकाका. ते मला नवी दृष्टि देतात. आणि महात्माजी तर सर्वांनाच देत आहेत. ज्याला सहानुभूति आहे तो सारें लौकर शिकतो. त्याला सारें पटकन् समजतें.''
''खरें आहे. आणि कलावानाचें हृदय जास्तींत जास्त सहानुभूतींने भरलेलें असतें. इतरांना दिसत नाहीं तें त्याला त्याच्या भावनेचा दिवा दाखवतो. तुमचें नांव काय ?''
''रंगा''
''वा:, सुंदर नांव. आमचें प्रदर्शन मांडायला तुम्ही मदत करा. येत जा. सध्यां तुम्हांला सुटीच आहे. आम्ही तुम्हांला कांहीं सन्मान्य देणगीहि देऊं.''
''मी केवळ पैशांचा आशक नाहीं. मला नवी नवी दृष्टि येईल. माझी कला व्यापक नि खोल होईल. म्हणून मी ही जागा धुंडीत आलों. मी गरीब आहें. मिळाली मदत तर हवीच.''