ताटातूट 1
''पंढरी, तूं पुढें काय कारणार ?''
''चुलते मला मिलिटरींत घालणार आहेत.''
''बंदुकवाला होणार तूं ?''
''कोठल्यातरी मिलिटरी खात्यांत हिशेब लिहायचे, टाईप करायचें, असें कारकुनी काम.''
''तुला शिकावेसें वाटतें ?''
''रंगा, मला कांही वाटत नाहीं. मी या जगांत एकटा आहें. कोणासाठीं शिकूं ? माझ्यामुळें कोणाला आनंद होणार आहे ? जाईन मिलिटरींत. युध्द आलें नि आमच्या कचेरीवर पडले बाँब तर खेळ खलास होईल.''
''तुझें माझ्यावर प्रेम नाहीं ?''
''रंगा, आज आपण येथें आहोंत. उद्यां आपण कोठे असूं ? कशाला ही प्रेमें, या मैत्री ? उद्या आठवणी येऊन रडूं यायचें.''
''आज आपण टिळक तलावांत पोहायला जायचें. येशील ?''
''हो. पोहायला मला आवडतें.''
ते दोघे मित्र दुपारीं पोहायला गेले. सुटी होती. दोघांनी उड्या मारल्या. एकमेकांला पकडीत होते, खेळत होते. जणुं प्रेमसागरांत तीं मुलें डुंबत होतीं. निर्मळ मैत्रीच्या गंगेत बुडत होते, वर येत होते.
''येथेंच आपण मेलों तर रंगा ?''
''वेडा आहेस तूं.''
''तुझी आई आहे. ती रडेल. मी विसरुनच गेलों.''
''मरण्याचे विचार नकोत. चल पुन्हां सूर मारुं.''
''मी आतां दमलों आहें.''
''चल घरीं जाऊं.''
दोघे मित्र बाहेर आले. पंढरी रंगाच्या घरीं आला. सुनंदाताईंनी दोघांना खायला दिलें. रंगानें आपलीं चित्रें दाखविलीं.