निष्ठुर दैव 4
''त्यांत आई काय बिघडलें ? त्या पोक्त झाल्या तरी मुलीची वृत्ति त्यांची असेल. कांहीं माणसें चिरतरुण असतात. जीवन असेंच असावें. जडजरठपणा कधींहि येऊं नये. नंदलाल सांगायचे, गुरुदेव म्हणत कीं प्रत्येक दिवस जुनाच असला तरी नवीन वाटतो. फुलासारखा ताजा, घवघवीत नि टवटवीत. आई, मग काय करायचें ?''
''माझें ऐक. माझी तडजोड छान आहे. विकूं नये घर म्हणतोस. परंतु तूं नोकरीहि करुं नयेस. तेव्हां उपाय म्हणजे घर गहाण ठेवणें. म्हणजे मला घर सोडून जायला नको. पैसेहि तात्पुरते होतील. मरणाच्या आधीं तुझ्या विश्वभारतींतील वास्तव्याची स्वप्नें ते रंगवीत. त्यांची ती स्वप्नें पुरीं नाहीं का करायची ? रंगा, ते काय म्हणतील ? त्यांचा देह गेला. त्यांची स्वप्नें, त्यांचे विचार या घरांतील अणुरेणूंत भरुन राहिले आहेत. मला ते विचार ऐकूं येतात. आपण त्या विचारांची पूजा केली पाहिजे. मी एक वेळ जेवेन, कोठें काम करीन, येथें मुलींच्या शाळेंत काम मिळेल का पाहीन; नाहींतर शिवणकामाचें यंत्र घेऊन तें काम सुरु करीन. परंतु तुझें शिक्षण पुरें झालें पाहिजे. जा विश्वभारतींत. जा मच्छलिपट्टणच्या कलाभवनांत. दक्षिणेकडे जाऊन नटराज वगैरे बघून ये. भारतीय कलांचा आत्मा आत्मसात् करुन तो नवीन स्वरुपांत जगासमोर रंगरुपानें मांड. नव्या जुन्या भारताचा तूं समन्वय करणारा. जुन्या भारतांतून नव भारत कसा येत आहे तें दाखव. समाजवादाला शंकराचार्य आशीर्वाद देत आहेत असें रंगा चित्र काढील ते म्हणत. समाजवाद म्हणजे प्रत्यक्ष वेदांत असें ते म्हणत.''
''होय आई. काकांची ती वाणी अजून माझ्या कानांत घुमत आहे. आपण गच्चींत होतों. अनंत तारे चमचम करित होते. काका शंकराचार्यांचें जीवन सांगत होते. समोर उत्तुंग हिमालय आहे. धवल शुभ्र. आणि दक्षिणेकडून तो बालसंन्यासी निघाला आहे. सभोवतीं ज्ञानप्रभा पचंकली आहे. अव्दैताचा प्रकाश सर्व विश्वाला द्यायला महापुरुष भारतयात्रेला निघाला आहे. आणि बोलतां बोलतां काका म्हणाले 'ते शंकराचार्य, हरिजनालाहि गुरु मानणारे शंकराचार्य, हिंदुस्थानांतील नद्या पाहून उचंबळणारे शंकराचार्य, ते असते तर आज काय करते ? ते समाजवादी झाले असते. म्हणाले असते अव्दैत आतां कृतींत आणूं. व्दैत म्हणजे माया. स्वत:लाच महत्व देणें म्हणजे माया. आसपासची सारी चराचर सृष्टि स्वत:ची मान; ती सुखव, हंसव, सुरंगी सुगंधी कर.' आई, काका कसे भावनावश होऊन त्या दिवशीं बोलत होते ! परंतु ती वाणी आतां कधीं ऐकायला मिळणार ? ती कायमची लोपली. असे कसे काका एकदम गेले ? दोन दिवसांचे दुखणें नि ते गेले.''