ताटातूट 2
''रंगा, तुझें माझ्यावर प्रेम ना आहे ?''
''हो.''
''माझें चित्र कां नाही काढलेंस ? कोठें आहे माझें चित्र ?''
''तूं समोर बस म्हणजे काढतों.''
''मी तुझ्या मनांत नाहीं ?''
''तरी समोर बघायला नको का ? परंतु थांब, दाखवूं तुझें चित्र ?''
रंगानें एक सुंदर कागदी पेटी उघडली. एका मनोहर आवरणांत एक चित्र होतें. रंगानें तें पंढरीला दिलें.
''केव्हां काढलेंस हें ?''
''चांगलें आहे ना ?''
''मी का इतका चांगला आहे?''
''कलावान् अधिक सुंदरता बघतो. जगाला जेथें दिसत नाहीं तेथेंहि ती त्याला दिसते.''
''नसेल तें तुम्ही बघाल आणि असेल तें ?''
''असेल तें अधिक यथार्थपणें बघूं, आंत शिरुन बघूं.''
''वासुकाका तुला शिकवतात असें बोलायला. होयना ?''
''ते मला किती तरी शिकवतात. चित्रकलेंतील नाना संप्रदाय, नाना विशेष, सारें सांगतात. त्यांना चित्रें काढतां येत नाहीं. परंतु ते शास्त्र जाणतात. त्यांनी अभ्यास केला आहे.''
''रंगा, मी जातों. नाहीं तर घरीं बोलणीं खावीं लागतील.''
''आई येईपर्यंत थांब.''
''नको, जातों.''
''थांब रे. माझ्यासाठी घरचीं बोलणीं सहन कर.''
''मायलेंकरांच्या भेटींत आमची अडगळ कशाला ?''
''माझ्या आईला तूंहि आवडतोस.''
''त्यांनी मला खायला पोळी दिली नि त्यांना शिव्या खाव्या लागल्या.''
''आई त्या शिव्यांना आशीर्वाद मानी.''