मामाकडे 1
काशी रंगाला घेऊन पुण्याला भावाकडे आली होती. शनिवारपेठेंतील एका वाड्यांत तें बिर्हाड होतें. घरांतील सारें काम आतां काशीच करी. तिला परिस्थितीची जाणीव होती. ती सारे अपमान सहन करी. सारीं बोलणीं सहन करी. मुलाला घेऊन ती कोठें जाणार ? भावाचाच काय तो तिला आधार होता.
पुण्याच्या इंग्रजी शाळेंत रंगा जाऊं लागला. त्याची चित्रकला तेथें प्रगट होऊं लागली. अनेक मुलांच्या वह्यांमध्यें तो चित्रें काढी.
''रंगा, माझ्या वहींत बांसरीवाला कृष्ण काढ.''
''रंगा, माझ्या वहींत महात्माजी काढतोस ?''
असें मुलें म्हणायचीं. रंगाचा हात झपझप चाले. तो पटपट रेषा ओढी आणि चित्र तयार होई. खरेंच तो जादुगार होता.
त्या दिवशीं रविवार होता. मामा घरीं होते.
''रंगा, अभ्यास बरा आहे नां ?''
''हो.''
''नंबर कितवा ?''
''बत्तिसावा''
''मुलें किती ?''
''पस्तीस''
''तुझा बत्तिसावा नंबर ? हा गाढवा, दिवसभर करतोस तरी काय ? गणित येतें का ? इतिहास वाचतोस का ? बघूं तुझीं पुस्तकें, वह्या. पुस्तकें आहेत कीं हरवलीं ? आण तुझी पिशवी.''
रंगानें मामांना पिशवी आणून दिली. मामांनी वह्या बघितल्या. जिकडे तिकडे चित्रें.
''अरे शाळेंत का रेघोट्या ओढित बसतोस ? शब्द नाहींत, गणितें नाहींत. ते मास्तर शिकवतात तरी काय ? हे बघ. पुढच्या महिन्यांत दहा नंबरच्या आंत नंबर यायला हवा. समजलास ? अभ्यास कर. उनाडूं नकोस. हे रंगकाम आंता पुरे.'' रंगा रडत दूर गेला. तिकडून आई आली.
''शंभरदां सांगितलें तुला कीं अभ्यास कर म्हणून. बत्तिसावा नंबर. लाज नाहीं वाटत तुला काटर्या. भिकमाग्या कुठला. ऊठ, पुस्तक घेऊन बस. कां घालूं पाठींत लाटणें. रडायला काय झालें ?'' आई संतापानें म्हणाली.