ताटातूट 4
''तितकीं चांगली नाहींत. आज वासुकाका कोठें गेले ?''
''शाळेंत कसली तरी सभा होती.''
''मी जातें आतां.''
सुनंदानें काशीताई, नयना, सर्वांना खायला दिलें. रंगाच्या पाठीवरुन हात फिरवून आई निघाली.
''जातें मी रंगा.''
''आईबरोबर येत जा. वासुकाका भेटतील केव्हां तरी.''
''अच्छा.''
असे दिवस जात होते. रंगाची सर्वांगीण प्रगति होत होती. परंतु एक वादळ आलें. उन्हाळ्याची सुटी लागणार होती. आजपासून शाळा बंद व्हायच्या होत्या. रंगा पास झाला होता. वासुकाका सुटींत त्याला महाबळेश्वरला नेणार होते. किती बेत होते. परंतु सारें स्वप्न ठरायचें होतें.
वासुकाकांना शाळेच्या चालकांनी कचेरींत बोलवून त्यांच्या हातीं त्यांनी लिफाफा दिला. काय होतें त्यांत ? पुढील वर्षापासून तुमची नोकरी नको असें त्यांत होतें.
''माझी काय चूक झाली ?'' वासुकाकांनी विचारलें.
''तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त इतर शिकवतां. समाजवाद शिकवतां, इतर अनेक गोष्टी सांगतां. आमचीं मतें तुम्हांला माहीत आहेत.''
''तीं चूक आहेत. भारतीय परंपरेला तीं शोभणारी नाहीत. सर्वांना एकत्र नांदवायचा भारतीय प्रयोग आहे.''
''तुमचा समाजवाद भारतीय परंपरेला शोभतो वाटतें ?''
''समाजवाद म्हणजे कृतींत आणलेला वेदान्त.''
''समाजवादांत धर्म आहे का ?''
''धर्म म्हणजे का अस्पृश्यता ? धर्म म्हणजे का आम्ही तेवढे सज्जन बाकी सारे दुर्जन असें म्हणणें ? धर्म म्हणजे का मानवतेला तिलांजलि, उदार भावना फेंकून देणें ? धर्म जोडीत असतो, तोडीत नसतो. धर्माचा खरा आत्मा सर्वांची धारणा नीट होण्यांत आहे. खरा धर्म सर्वांचे संसार सुंदर होण्यासाठीं झटेल. समाजवाद तुमच्या रुढी धर्माला मानीत नाहीं. अमुक जात श्रेष्ठ, अमुक मानववंश श्रेष्ठ असें मानित नाहीं. मानव्याचा खरा धर्म समाजवाद मानतो. ईश्वर मानून मानवांचा संहार करण्यापेक्षां त्याला न मानणारा परंतु मानवांना जवळ घेणारा खरा धार्मिक आहे. तुम्हांला महंमद पैगंबराची गोष्ट आहे माहीत ?''