ताईची भेट 4
ती स्वयंपाकघरांत गेली. आणि ती खरंच जेवली. तिनें त्याची वास्तपुस्त घेतली नाहीं ती आंथरुणावर पडली. तिनें दिवा मालवला होता. तो तापानें विव्हळत होता.
''थोडें पाणी देतेस का ?''
ती उठली. तिनें त्याला पाणी दिलें. परंतु एक शब्द ती बोलली नाहीं. उजाडलें. ती डॉक्टरकडे गेली नाहीं. तिनें त्याला चहा दिला. तो जें मागे तें ती देई. ती जवळ बसली नाहीं. तिनें पाय चेपले नाहींत. ती स्वयंपाकघरांत बसे.
त्याच्या कचेरींतील त्याचा एक मित्र आला.
''कायरे आजारी का ?''
''ताप येतो.''
''औषध''
''निघेल ताप. डॉक्टर तरी कोण आणणार ?''
''मी आणतों''
त्या मित्रानें डॉक्टर आणला. येतांना कांही फळें आणलीं. डॉक्टरानें तपासलें. मित्र डॉक्टरांबरोबर गेला नि औषध घेऊन आला.
''औषध घे मी जातों'' असें म्हणून तो गेला. मोसंबी कोण सोलून देणार ? आणि हात धरुन मोरींत कोण नेणार ? बेडपॅन कोण देणार ?
''माझा हात धरुन नेतेस का ?''
''रंगानें ना रंगवला हा हात ? हा हात चालेल का ? हा माझा अमंगल हात ?''
''नको छळूंस. नको वाभाडे काढूंस.''
एके दिवशीं तो तिला म्हणाला :
''मला रंगाला पत्र लिहायचें आहें. त्याची क्षमा मागतों. मेलों तर मनाला रुखरुख नको. लिलीची क्षमा देवाघरीं मागेन.''
''तुम्हांला का देवाच्या घरांत घेतील ?''
''तो सर्वांचा आहे. देवाच्या घराबाहेर मनुष्य कोठें राहील ? ही खोलीहि त्याचीच. येथेंहि तो आहे. ही जाणीव ठेवून वाग. आपण जणूं नेहमीं देवघरांत असतों.''