भारत-चित्रकला-धाम 14
ताईनें सर्वांना चहा करुन आणला.
''ताई तूं बस ना येथें. नयना कांही परकी नाहीं.''
''मला ठाऊक आहे.''
सर्वांनी चहा घेतला. सुनंदा राममंदिरांत जायला निघाली. कोणीतरी प्रवचनकार आला होता. त्याची प्रवचनें आजपासून सुरु व्हायचीं होतीं.
''ताई येतेस ?''
''येतें.''
''नयना तूं ?''
''मी रंगाजवळ बोलत बसेन.''
''त्याला थकवा नको आणूं.''
''मीच बोलेन. तो ऐकेल. ऐकून नाहींना रे थकवा येणार ?''
''नाहीं'' तो हंसून म्हणाला.
ताई, सुनंदा मंदिरांत गेली. रंगा नि नयना तेथें होतीं. परंतु कोणीच बोलत नव्हतें. अखेरीस नयना म्हणाली.
''रंगा, शेवटी मी आलें आहे. नदी सागराकडे आली आहे.''
''तुझे वडील काय म्हणाले ?''
''मी अजिंठा पाहून येतें म्हणून सांगून आलें. त्यांना मी पत्र लिहीन कीं नयना आतां तुमची नाहीं.''
''तूं वेडेपणा करित आहेस. नयना, मी आतां फार दिवस वांचणार नाहीं. मरणोन्मुखाजवळ कशाला लग्न लावूं बघतेस ? पित्याला दु:खी नको करुं. तुझ्या हृदयाच्या कोपर्यांत माझी स्मृति ठेव. मुख्य देव दुसरा होवो.''
''रंगा, नको असें बोलूंस. मी परत जाण्यासाठी आलें नाहीं.''
''मी मरणपंथाचा यात्रेकरु.''
''आपण सारींच आहोत.''
''माझी यात्रा संपत आली आहे. तूं जग. माझी ध्येंये पुरी कर. जागतिक प्रदर्शन भरणार होतें. मी कांही सुदर चित्रें तयार केलीं आहेत. अजून सारीं पुरीं नाहीं झाली. थकवा येतो. तूं कर तीं पुरी.''