मुंबईला 5
''रंगा मला पुरणपोळी करुन तिकडे पाठव. पार्सल करुन. बरं का. तिकडच्या पठाण मित्रांना पोळी देईन. ते मला द्राक्षें देतील.''
''टोळीवाले तुला पळवून नेतील. जप''
''मी सदैव बेपिकीर असतों.''
रंगा पंढरीला पोंचवायला गेला. मेलनें तो जाणार होता. दोघे मित्र सद्गदित झाले होते. दोघे सम:दुखी. दोघांना मायबाप नाहीं. सख्खें असें कोणी नाही. परंतु त्यांतल्यात्यांत रंगा अधिक भाग्यवान् होता. तो जाई तेथें त्याला प्रेमळ माणसें लाभत. प्रभु अनंत रुपानें त्याच्यासाठी जणुं धांवून येई. एका कवीचे ते चरण तो कधीं कधीं चित्र काढतांना गुणगुणत असे :
''कशास चिन्ता करिशी उगीच
जिथें तिथें माय असे उभीच
मना कशाला करितोस खंत
जिथें तिथें हा भरला अनन्त !!''
परंतु पंढरीला अशीं प्रेमळ माणसें फारशीं लाभलीं नाहींत. त्याच्यावर प्रेम करणारा एक रंगाच होता.
गाडीची वेळ झाली.
''पंढरी, पत्रें पाठव; तूं उत्तरेकडे जात आहेस. वर जात आहेस''
''देव नाहीं रे अजून वर नेत !''
''त्या अर्थी तुला कांही तरी करायचें आहे. वेळ येईल तेव्हां तो सर्वांना नेईल. सुखी अस. मी तरी तुला आहें ना ?''
पंढरी गाडींत बसला. सीमागाडी निघाली. हात सुटले नि डोळ्यांतून शतधारा सुटल्या. रंगा घरीं आला. पंढरी खिडकीबाहेर तोंड ठेवून डोळे रिकामे करुन कोरडे करित होता.
कांही दिवस रंगा उदासीन होता. परंतु पुन्हां तो रंगांत रंगला, कामांत दंगला. मे महिना जवळ येत होता. परंतु रंगा काकांकडे दुधगांवला जाणार नव्हता. मुंबईतच एका वर्गाला जाणार होता. दादरचा तो कलावर्ग फार सुंदर होता. ध्येयवादी कलावान् तेथें शिकवित. ग्रामीण जीवनावरचीं तेथें सुंदर चित्रें होतीं. समाजवादी जीवन आणि आजचें जीवन अशी दोन चित्रात्मक प्रदर्शनें त्या वर्गातर्पेच् एकदां मांडण्यांत आलीं.